डिझेल दरवाढीचा एसटी महामंडळाला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 03:43 AM2021-02-09T03:43:58+5:302021-02-09T03:44:20+5:30
गेल्या वर्षी फेब्रुवारीत महामंडळाला मिळणाऱ्या डिझेलचे दर ६६ रुपये लिटर होते. यावर्षी ते ७९ रुपये लिटर आहे.
मुंबई : कोरोनामुळे एसटीला माेठा आर्थिक फटका सहन करावा लागला. आता काेराेना नियंत्रणात आल्याने हळूहळू प्रवासी वाहतूक सुधारत असली तरी डिझेल दरवाढीमुळे एसटीला दररोज एक कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्यावर्षी एसटीतील वाहनांची संख्या जास्त होती. दैनंदिन १२ लाख लिटर डिझेलचा वापर केला जात होता. मात्र, यावर्षी वाहनांची संख्या कमी आणि दैनंदिन ९ लाख लिटर डिझेल लागत असताना, इंधन दरवाढीमुळे एसटी डिझेल खर्चात वाढ झाल्याने मंडळाला आर्थिक नुकसान हाेत आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत महामंडळाला मिळणाऱ्या डिझेलचे दर ६६ रुपये लिटर होते. यावर्षी ते ७९ रुपये लिटर आहे. एसटीला दिवसाला एक कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने ९ जानेवारी रोजी सततच्या इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीची भाडेवाढ जाहीर केली होती.
भाडेवाढीबाबत निर्णय नाही
दरवाढीपूर्वी ३८ रुपये प्रति किमी रुपये दर घेतले जात होते. इंधन दरवाढीमुळे ४ रुपयांची वाढ करून ४२ रुपये प्रति किमी दर सध्या मालवाहतुकीसाठी आकारले जात आहेत. भविष्यात प्रवासी वाहतुकीचे भाडेही वाढण्याची शक्यता आहे. मात्र, प्रवासी भाडेवाढीसंदर्भात अद्याप निर्णय झाला नसल्याचे एसटी महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी सांगितले.