एसटीला डिझेल दरवाढीचे चटके
By admin | Published: May 5, 2016 02:06 AM2016-05-05T02:06:14+5:302016-05-05T02:06:14+5:30
एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचे चटके बसत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील सलग तीन वेळा डिझेल दरवाढीमुळे एसटीला वर्षाला १८0 कोटींचा फटका बसणार आहे.
मुंबई : एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचे चटके बसत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील सलग तीन वेळा डिझेल दरवाढीमुळे एसटीला वर्षाला १८0 कोटींचा फटका बसणार आहे.
एसटी महामंडळाच्या राज्यात सुमारे १७ हजार बस धावतात. बहुतांश डिझेलवर बसेस धावत असून वर्षाला १२ लाख लिटर डिझेल एसटी महामंडळाला लागते. एसटी महामंडळाकडून एकूणच डिझेलवर वर्षाला २,४00 ते २,६00 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. एसटीकडून होणाऱ्या खर्चात ३५ टक्के खर्च हा डिझेलवरच केला जातो. एप्रिल महिन्यात दोन वेळा आणि मे महिन्याच्या सुरुवातीला एकदा डिझेलच्या दरात वाढ झाली. या दरवाढीमुळे एसटी महामंडळाला यापुढे वर्षाला १८0 कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज एसटी महामंडळाकडून बांधण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या दरवाढीमुळे महामंडळाला दररोज ६ कोटी ६0 लाख रुपये जादा मोजावे लागत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनही दरवाढ झाल्यामुळे आणखी प्रत्येक दिवशी ३६ लाख रुपयांची भर पडली आहे.
१ आॅक्टोबर रोजी राज्य सरकारकडून डिझेलवर २ रुपये व्हॅट आकारण्यात आला आणि त्याच दिवशी केंद्राकडून ४९ पैसे प्रति लिटर दर वाढविण्यात आला. त्यानंतर १६ आॅक्टोबरपासून डिझेलच्या किमतीत ६२ पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली. १ नोव्हेंबरपासून ८४ पैसे प्रति लिटर वाढ केली आणि अर्धा टक्के स्वच्छता उपकरही आकारला. तर १६ नोव्हेंबरपासून ८९ पैसे दरवाढ झाली. या दरवाढीमुळे आणखी जादा आर्थिक भार सहन करावा लागत असतानाच त्यात पुन्हा एकदा १८0 कोटी रुपयांची भर पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)