आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळली
By Admin | Published: April 2, 2017 12:43 AM2017-04-02T00:43:10+5:302017-04-02T00:43:10+5:30
येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील जेवणात पाल आढळल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. त्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकत आंदोलन छेडले.
नंदुरबार : येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील जेवणात पाल आढळल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. त्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकत आंदोलन छेडले.
प्रकल्प अधिकारी निमा अरोरा यांनी कारवाईचे आश्वासन देवूनही विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. आदिवासी विकास विभागातर्फे नंदुरबारमधील पटेलवाडी भागात वसतिगृह चालविले जाते. तेथे जेवण बनविण्याचा ठेका देण्यात आला आहे.
आधीच विद्यार्थ्यांची निकृष्ट जेवणाबाबत तक्रार होती. त्यातच शनिवारी सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना जेवण वाढताना त्यात मेलेली पाल आढळून आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
विद्यार्थ्यांनी वसतिगृहाबाहेर येवून आंदोलन केले. जेवणावर बहिष्कार टाकला. ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली. प्रकल्प अधिकारी निमा अरोरा यांच्यासह इतर अधिकारी वसतिगृहात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ठेकेदारावरही कारवाईचे आश्वासन दिले. परंतु विद्यार्थ्याचे समाधान झाले नाही. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)