वातावरणातील फरक विध्वंसक
By admin | Published: May 14, 2017 05:28 AM2017-05-14T05:28:56+5:302017-05-14T05:28:56+5:30
वातावरणात अचानक होणारे बदल, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारख्या गरमीचा अनुभव येणे, पावसाळ्याचा कालावधी बदलत असणे;
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वातावरणात अचानक होणारे बदल, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारख्या गरमीचा अनुभव येणे, पावसाळ्याचा कालावधी बदलत असणे; या गोष्टी आपल्याला विध्वंसाकडे घेऊन जात आहेत. ठरावीक काळानंतर पडणारा दुष्काळ, शहरासह देशभरातले वाढत जाणारे तापमान आणि मोठ्या प्रमाणातील प्रदूषणसुद्धा येऊ घातलेल्या विध्वसंकतेला तितकेच पूरक आहे, असे प्रतिपादन मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी ‘बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा’ या विषयावर आयोजित व्याखानात कृष्णानंद होसाळीकर बोलत होते. मुंबई विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, हवामानाच्या भयंकर परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. आपणच सर्वत्र निसर्गाची हानी केली आहे. आपणच ग्लोबल वॉर्मिंग वाढवले आहे. मुंबईतली उष्णता वाढण्यामागेसुद्धा आपणच आहोत. आपण झाडे तोडली त्यात भर म्हणून सर्वांनी आपआपली घरे वातानुकूलित केली आणि बाहेरचे तापमान वाढवले. म्हणून शहरासह देशभरातील उष्णता वाढली आहे. २००२, २००५, २००९, २०१० आणि २००१६ ही आतापर्यंतची सर्वात उष्ण वर्षे होती. तर यंदाचा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण होता.
यंदा देशासह महाराष्ट्रात ९६ टक्के पाऊस पडेल. मुंबईत मान्सून कधी दाखल होईल, हे सध्या सांगता येणार नाही. वेधशाळेच्या पुढील अभ्यासानंतर मान्सूनबद्दलची माहिती येत्या काळात देण्यात येईल.
मुंबईत तर हिवाळा नसतोच. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके दिवस मुंबईतल्या हवेत थोडासा गारवा असतो; त्यालाच आपण मुंबईकर हिवाळा मानतो.
>यंदाचा अपेक्षित पाऊस
कोकण आणि गोवा - ९६ टक्के
मध्य महाराष्ट्र - ९७ टक्के
मराठवाडा - ९९ टक्के
विदर्भ - ९६ टक्के