अधिवेशनाआधीच विरोधकांमध्ये फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:34 AM2017-07-24T05:34:05+5:302017-07-24T05:34:05+5:30

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचे चित्र अधिवेशनाच्या

Differences among opponents before the convention | अधिवेशनाआधीच विरोधकांमध्ये फूट

अधिवेशनाआधीच विरोधकांमध्ये फूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचे चित्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस पाहायला मिळाले. त्यामुळे सत्ताधारी निश्चिंत झाले आहेत. सरकारच्या कारभारात ‘झोल’ असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत केली.
अधिवेशनाच्या आदल्या दिवशी प्रथेप्रमाणे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेते संयुक्त पत्रकार परिषदेस संबोधित करणार होते. मात्र,  इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आधी घ्यायचा की शरद पवारांचा यावरुन झालेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली. विखे-पाटील यांनी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि जनता दल (युनायटेड) आदी पक्षांची तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेला संबोधित केले.
सरकारची कर्जमाफी योजना फसवी आहे. बँकांकडे असलेल्या आकडेवारीच्या आधारे कर्जमाफी देणे शक्य आहे. परंतु, सरकारने आता अर्ज वाटप करुन शेतक-यांची पात्रता निश्चित करण्याचा घाट घातला आहे. कर्जमाफीची घोषणा करण्यास विलंब झाल्याने शेतक-यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारने या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. पण प्रत्यक्षात शिवरायांच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मीलवरील स्मारक आणि अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अजून पुढे गेलेले नाही. पण त्यांची नावे वापरून लोकांची दिशाभूल मात्र सुरूच असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.
शेतक-यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालालला हमीभाव, नेवाळे येथील शेतकरी आंदोलनात पॅलेट गनचा वापर आदी प्रश्नावर सरकारला धारेवर धरू. ‘राज्य सरकारचा सगळा कारभार गोल, गोल आहे. त्यात मोठा झोल आहे.’ त्यामुळे सरकारवर जनतेचा भरोसा राहिला नाही, अशी टीका धनंजय मुंढे यांनी राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत केली.
ते एकत्र राहावेत
ही टायपिस्टची इच्छा
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांमध्ये आम्ही फूट पाडलेली नाही. त्या फुटीचा आम्हाला फायदाही नको आहे. त्यांनी आयुष्यभर विरोधातच राहावे. आज दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवेदने माझ्याकडे पाठविली पण मजकूर अगदीच सारखा होता. म्हणजे ते एकत्र राहावेत ही टायपिस्टची इच्छा आहे, असा चिमटा त्यांनी काढला. विधिमंडळाचे सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भाजप, शिवसेनेसह सर्व घटक पक्ष चहापान कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजपा-शिवसेनचे मंत्री उपस्थित होते.

Web Title: Differences among opponents before the convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.