विद्यापीठ आणि शासनाच्या क्रीडा धोरणात तफावत
By admin | Published: November 9, 2015 09:04 PM2015-11-09T21:04:52+5:302015-11-09T23:40:29+5:30
मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग संचालक विनोद शिंदे यांचे मत
महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातही शहरापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा सहभाग अधिक आहे. अनेक विद्यार्थिनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करतात. मात्र, या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांची संख्या हातावर मोजता येण्याइतकीच आहे. शेवटपर्यंत टिकून राहात नसल्यामुळेच आपल्या जिल्ह्यातील खेळाडू फार कमी चमकतात. खेळाडूंसाठी राखीव गुण असून, नोकरीमध्येही राखीव जागा आहेत. मात्र, आपल्याकडील विद्यार्थी त्यामध्ये कमी पडतात. काही विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नसते, तर काही विद्यार्थी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात कमी पडतात. केवळ गुणांसाठी क्रीडा क्षेत्रात भाग घेण्याऐवजी जिद्दीने व महत्वाकांक्षेने सहभागी झाले तर नक्कीच यश मिळते.
महिलांनी अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. विविध क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. काही वर्षांपूर्वी क्रीडा क्षेत्रात महिलांची संख्या अल्प होती. मात्र, आता नेमकी परिस्थिती उलटी आहे. ९५ टक्के महिलांचा सहभाग आहे, तर उर्वरित पाच टक्क्यांमध्ये पुरूष आहेत. त्यात ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण अधिक आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक मुली आवड म्हणून क्रीडा क्षेत्राकडे वळतात, तर काही गुण मिळवण्यासाठी सहभागी होतात. वास्तविक शासन व विद्यापीठाच्या क्रीडा धोरणात तफावत आहे. गुणांसाठी महाविद्यालयातील क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी शालेयस्तरापासूनच त्याची मोट बांधली जाणे आवश्यक आहे. शालेयस्तरावर क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असल्या तरी प्रत्यक्ष सहभाग किती होतो, हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवणाऱ्यांची संख्या अल्प आहे, ती वाढण्याची अपेक्षा आहे. आॅलिम्पिकचे स्वप्न ठेवूनच जिद्द, महत्त्वाकांक्षेने खेळाडूंनी या क्षेत्रात वाटचाल केली पाहिजे. याबाबत मुंबई विद्यापीठ क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विनोद शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : गुण मिळवण्यासाठी क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होतात का?
उत्तर : निव्वळ गुणांसाठी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गुणांसाठी, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहभागाचे बाजारीकरण थांबण्याची आवश्यकता आहे. पालकांनी गुण पाहण्याऐवजी बेस पाहाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची आवडनिवड पाहून प्रवेश घेतला तर नक्कीच कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते.
प्रश्न : शालेयस्तरापेक्षा पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या क्रीडा स्पर्धेत अधिक आहे का?
उत्तर : बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्राकडे वळणारे विद्यार्थी अधिक आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांत सहभागी होतात. क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. महाविद्यालयात आल्यानंतर खेळाडूंना एक दिशा मिळते. त्यानंतर ते वाटचाल करतात. खेळाडूंनीही मिळालेल्या प्रमाणपत्रांचा वापर प्रवेश प्रक्रियेसाठी करणे आवश्यक आहे. अनेकवेळा प्रमाणपत्र जोडत नसल्यामुळे प्रवेश हुकतो. त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अपडेट राहणे आवश्यक आहे.
प्रश्न : मुंबई विद्यापीठांतर्गत गोगटे - जोगळेकर महाविद्यालय टॉपटेनमध्ये आहे ?
उत्तर : मुंबई विद्यापीठांतर्गतच्या ७०० महाविद्यालयामध्ये गोगटे - जोगळेकर महाविद्यालय पहिल्या दहामध्ये आहे. अॅथलेटिक्स महिला संघाने सलग चार वर्षे चॅम्पियनशीप मिळविली आहे. खो-खो खेळात तर राष्ट्रीय पातळीवर चॅम्पियनशीप मिळवली आहे. याशिवाय सांघिक, वैयक्तिक बक्षिसे मिळवणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
प्रश्न : क्रीडा क्षेत्रातील मानाचा समजणारा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळवणाऱ्यांची संख्या आपल्याकडे अल्प आहे का?
उत्तर : हो! आतापर्यंत दोन महिलांनी हा पुरस्कार मिळविला आहे. बेंच बेस व पॉवरलिफ्टिंग प्रकारात हे पुरस्कार मिळविले आहेत. त्यामुळे पुरस्कारप्राप्त खेळाडंूची सामाजिक जबाबदारी वाढली आहे. त्यांनी किमान दहा तरी खेळाडू तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून नवख्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.
प्रश्न : शालेयस्तरावर खेळाडू घडवण्यास कोणत्या अडचणी भासतात?
उत्तर : शालेयस्तराची सुरुवातच मुळी जिल्हा परिषदेच्या शाळांकडून होते. शहरी भागातील पालक आपल्या विद्यार्थ्याना विविध कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतात. मात्र, ग्रामीण भागात याचा अभाव आहे. काही शाळांकडे तर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नाही. मैदान असले तरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यांचीही संख्या अल्प आहे. त्यामुळे जिथे पाया रोवण्याची गरज आहे, तिथे काहीच होत नाही. त्यामुळे शहरी शाळावगळता ग्रामीण भागातील खेळाडूंची संख्या अल्प आहे. मात्र, महाविद्यालयात आल्यानंतर हीच परिस्थिती उलटी होते. मुलांमधील स्पार्क ओळखून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे.
प्रश्न : असोसिएशनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे का?
उत्तर : विविध खेळांसाठी असोसिएशनकडून मार्गदर्शन करण्यात येते. खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. असोसिएशनची संख्या वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत महाराष्ट्र संघापर्यंत जाणाऱ्या खेळाडूंची संख्या अल्प आहे. त्यासाठी पाठपुरावा होणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्हा महिलांचा क्रिकेट संघ निर्विवाद यश संपादन करीत आहे. त्यासाठी क्रीडा प्रशिक्षकांचेही कष्ट अधिक आहेत. परंतु महाराष्ट्र संघात स्थान मिळवणाऱ्यांची संख्या अल्प आहे, ती वाढणे आवश्यक आहे.
- मेहरुन नाकाडे