विदर्भात मतभिन्नता!
By admin | Published: May 29, 2016 02:09 AM2016-05-29T02:09:43+5:302016-05-29T02:09:43+5:30
सिंचनासाठी कालव्यांऐवजी पाइपने पाणी देण्याचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या काही प्रमाणात योग्य वाटत असला तरी तो पूर्णत: सक्षम नाही, असा एक मतप्रवाह आहे. एखाद्याच्या शेतातून
- नंदू परसावार, भंडारा
सिंचनासाठी कालव्यांऐवजी पाइपने पाणी देण्याचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या काही प्रमाणात योग्य वाटत असला तरी तो पूर्णत: सक्षम नाही, असा एक मतप्रवाह आहे. एखाद्याच्या शेतातून पाइपलाइन टाकताना संबंधित शेतकऱ्याने परवानगी नाकारली तर अडचणींना सामोरे जावे लागेल, असा दुसरा मतप्रवाह आहे.
भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द हा राष्ट्रीय तर बावनथडी हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. त्यापैकी गोसेखुदची क्षमता १,१४६.०६ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या धरणात २५ टक्के जलसाठा आहे. त्याच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली येथे पाणी जाते. कालव्यातून पाइपलाइन टाकणे, असा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पाइपलाइनच्या निर्वहनक्षमतेला कालमर्यादा असल्यामुळे पाइपलाइन कालांतराने जीर्ण होते. भंडारा शहरातील पाइपलाइन जीर्ण झाल्यामुळे शहरवासीयांना दूषित पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कालव्यातून पाइपलाइनने पाणीपुरवठा करणे याविषयी अधिकाऱ्यांमध्ये
साशंकता आहे.
धरणापासून ४५ कि.मी. अंतरावर असलेला जलसेतू क्षतिग्रस्त झाल्यानंतर मागील वर्षी १ मीटर व्यासाची पाइपलाइन टाकून आसोला मेंढा तलावात पाणी सोडण्यात आले होते. मागील वर्षी गोसेखुर्द धरणाचे पाणी १६० कि.मी.पर्यंत नेण्यात आले. १० हजार हेक्टरच्या वर पिकांना पाणी दिले. त्यामुळे ९५ कोटींची पिके वाचविण्यात आल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.
- अ.ज. सांगोडे, कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द उजवा कालवा विभाग
यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रकल्पाची किंमत दिवसेंदिवस वाढत असताना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पाणी साठविण्यापर्यंत धरणाचे काम झाले आहे. परंतु पाण्याचा वापर कसा करायचा याबाबतचे धोरण स्पष्ट नाही. कालव्याऐवजी पाइपलाइनने पाणी देणे शक्य असले तरी पाइपलाइनसाठी भूसंपादन करावे लागणार नाही. असे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही.
- विलास भोंगाडे, संयोजक,
गोसेखुर्द संघर्ष समिती