विधान परिषदेत वेगळे सूर; महायुती टिकणार की नाही? मित्रपक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:29 PM2024-05-29T12:29:04+5:302024-05-29T12:29:34+5:30
लोकसभेला एकत्र असलेल्या महायुतीतील पक्षांची स्वबळ अजमावण्याची भाषा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध दंड थोपटण्याची शक्यता आहे. लोकसभेला एकत्र असलेल्या महायुतीतील तीन पक्षांनी उमेदवार परस्पर जाहीर करणे सुरू केले असल्याने या निवडणुकीत महायुती टिकणार की नाही या बाबत साशंकता आहे. विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून अजित पवार गट आणि शिंदे सेनेत संघर्ष होणार असे चित्र आहे. अजित पवार गटाकडून या मतदारसंघात शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नलावडे यांच्या नावाची घोषणा केली. नलावडे हे अजित पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष आहेत.
याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास शिंदे सेनेचे शिवाजी शेडगे इच्छुक आहेत. शेडगे स्वतः शिक्षक असून शिंदे सेनेच्या शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्ती आहेत. २०१८ मध्ये या निवडणुकीत तेव्हाच्या एकत्रित शिवसेनेकडून शेडगे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र ते दुसर्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेने ही जागा यापूर्वी लढल्याने शिंदे सेना या जागेवर दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यातच अजित पवार गटानेही या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये संघर्ष
- विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून मनसे आणि भाजप आमने-सामने आली आहे.
- मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मनसेचे खेडमधील नेते वैभव खेडेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
- मनसेचे नेते बाळा नांदगावकर सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे यांना भेटले. भाजपनेही या जागेवर हक्क सांगितला आहे.
- कोकण पदवीधरची जागा आमची हक्काची आहे.तिथे आमचे निरंजन डावखरे आमदार आहेत.
- आम्ही ही जागा नक्की लढू. मनसेला आमच्या शुभेच्छा आहेत, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी माध्यमांना सांगितले.