व्यापार मेळ्यामध्ये डिजिटल महाराष्ट्र
By admin | Published: November 13, 2016 03:19 AM2016-11-13T03:19:39+5:302016-11-13T03:19:39+5:30
प्रगती मैदानावर १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्रातर्फे ‘डिजिटल महाराष्ट्र’ हे दालन उभारण्यात येणार असून, त्यामुळे राज्याची वनसंपदा
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
प्रगती मैदानावर १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्रातर्फे ‘डिजिटल महाराष्ट्र’ हे दालन उभारण्यात येणार असून, त्यामुळे राज्याची वनसंपदा, उद्योग क्षेत्रातील प्रगती इत्यादीचे डिजिटल व व्हर्च्युअल दर्शन देश-विदेशातील ग्राहकांना व पर्यटकांना घडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १४ नोव्हेंबर रोजी या दालनाचे उद्घाटन करणार असून, अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री सुभाष देसाई असतील.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन संघटनेतर्फे दरवर्षी या तारखांना आंतराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन केले जाते. यंदा संकल्पना डिजिटल इंडिया आहे. व्यापार मेळ्यात २४ देश, भारतातील २७ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश सहभागी होत आहेत. महाराष्ट्राच्या दालनात तळमजल्यावर लघुउद्योगांचे ८0 स्टॉल्स विक्री व प्रदर्शनासाठी असतील. विविध हस्त शिल्प कलांच्या प्रात्यक्षिकांसाठी १८0 हस्त शिल्पकारांसह लघुउद्योजकही यात सहभागी आहेत. तसेच महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, सिडको, सिकॉम यांचेही स्टॉल्स असतील.
राज्याच्या दालनात सनई-चौघडा वादनासह लोकवाद्ये, तुतारीच्या निनादात स्वागत केले जाणार असून, ‘शाबास इंडिया’ पथकातर्फे तलवारबाजी, शारीरिक कसरती दांडपट्टा सादर करण्यात येतील. रोज विविध लोककला सादर केल्या जातील आणि २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र संस्कृती दर्शन दिन कार्यक्रम होईल. त्यात कलारंजन सांस्कृतिक पथकाचे ३४ कलाकार सहभागी होत आहेत.
जगातील ७ हजार कंपन्या उत्पादनांसह सहभागी होत आहेत. आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह २४ देशांतील २४0 कंपन्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीचे भव्य स्टॉल्स आहेत. दक्षिण कोरिया या मेळ्याचा भागीदार देश असून, बेलारूस फोकस देश आहे. हरयाणा हे फोकस राज्य तर मध्य प्रदेश व झारखंड ही भागीदार राज्ये आहेत. व्यापारी वर्गासाठी १४ ते १८ नोव्हेंबर हे पाच राखीव आहेत, तर १९ नोव्हेंबरपासून सर्वसामान्य जनतेला मेळा खुला होईल.