डिजिटल सातबारा उतारे : पुण्यासह सर्व जिल्ह्याचे काम क्लाऊडवरून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 12:23 PM2019-04-30T12:23:23+5:302019-04-30T12:28:03+5:30
राज्यातील २२ जिल्ह्यांचे काम क्लाऊडवरून सुरू झाले आहे. तसेच काही दिवसांपासून उर्वरित ११ जिल्हे क्लाऊडवर घेवून जाण्याचे काम सुरू आहे.
पुणे : महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांचे काम क्लाऊडवरून सुरू झाले आहे. तसेच काही दिवसांपासून उर्वरित ११ जिल्हे क्लाऊडवर घेवून जाण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यातील बहुतांश सर्व जिल्हे क्लाऊडवर येणार आहेत.
सर्व सामान्य नागरिकांना सातबारा उतारे मिळण्यासाठी तलाठी कार्यालयाकडून होणारा त्रास कमी करण्यासाठी डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू आहे. कोकण भागातील व नाशिक परिसरातील काही तालुक्यांच्या अपवाद वगळता बहुतांश सर्व तालुक्यांचे डिजिटल सातबारा उताऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सर्व्हवर काम करताना अडचणी येत असल्याने शासनाने सर्व प्रक्रिया क्लाऊडवरून चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून टप्प्या टप्प्याने राज्यातील २२ जिल्हे क्लाऊडवर स्थलांतरित केली. आता ११ जिल्हे क्लाऊडवर घेवून जाण्याचे काम सुरू आहे.
पुण्यासह अकोला, गडचिरोली, नागपूर, धुळे, भंडारा, बुलढाणा,वर्धा, अमरावती, पालघर, रायगड या जिल्ह्याची सर्व्हवरवरील माहिती क्लाऊडवर स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु, पुढील दोन दिवसात या ११ जिल्ह्याचे स्थलांतर क्लाऊडवर होणार असल्याने डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करण्याच्या प्रक्रियेस गती मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.