डिजिटल शाळांची घोषणा रखडली!
By admin | Published: February 13, 2017 03:41 AM2017-02-13T03:41:19+5:302017-02-13T03:41:19+5:30
पूर्णपणे कॅशलेस झालेल्या मुरबाड तालुक्यातील धसई गावाला राज्यपाल सी. विद्यासागर राव उद्या १३ फेब्रुवारीला भेट देणार होते, पण काही अपरिहार्य कारणास्तव हा दौरा रद्द झाला
ठाणे : पूर्णपणे कॅशलेस झालेल्या मुरबाड तालुक्यातील धसई गावाला राज्यपाल सी. विद्यासागर राव उद्या १३ फेब्रुवारीला भेट देणार होते, पण काही अपरिहार्य कारणास्तव हा दौरा रद्द झाला आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत हा दौरा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) शाळा १०० टक्के डिजिटल झाल्याची घोषणाही याच कार्यक्रमात होणार होती. मात्र, आता ती लांबणीवर गेली आहे. या दौऱ्यास अनुसरून जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करून, तसा अहवाल देण्यासाठी १० फेब्रुवारीची मुदत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) किशोरराजे निंबाळकर यांनी दिली होती. यासाठी शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांकडे पाठपुरावा करून शाळा डिजिटल करून घेण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी शिक्षकांनीदेखील रात्रंदिवस पायपीट करून शाळा डिजिटल केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील एक हजार ३६३ पैकी बहुतांशी प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या आहेत.
मात्र, पोलीस अधीक्षक व जिल्हा प्रशासनाकडे राज्यपालांच्या या दौऱ्याचा कार्यक्रम आलेला नाही. यामुळे जि.प.ला तशी पूर्वसूचना मिळालेली नाही. राज्यपालांचा हा दौरा अद्यापही निश्चित नाही. १६ फेब्रुवारीपर्यंत हा दौरा होणार असल्याची चर्चा असल्याचे जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)