पोलीस ठाण्यांचे डिजिटायझेशन, देशभरातील गुन्ह्यांची माहिती एका ‘क्लिक’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 03:00 AM2017-09-25T03:00:49+5:302017-09-25T03:01:08+5:30
देशभरातील कोणत्याही गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी आता तपासाधिका-यांना संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही.
सुनील पाटील
जळगाव : देशभरातील कोणत्याही गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी आता तपासाधिका-यांना संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही. गुन्ह्याची माहिती, तसेच स्टेशन डायरी ‘सीसीटीएनएस’ प्रणालीशी जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत देशभरातील सर्व पोलीस ठाणी आॅनलाइनने जोडली जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ‘विप्रो’ या आयटी कंपनीला कंत्राट दिले असून, पोलीस ठाण्यांना सॉफ्टवेअर पुरविण्यात येत आहे. पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली संगणक व सायबर शाखेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. १९९८ पासूनची माहिती संगणकात समाविष्ट केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात २०१५ पर्यंतचा डेटा समाविष्ट झालेला आहे.
जळगाव जिल्ह्यात १९९८ ते २०१५ पर्यंतच्या गुन्ह्यांच्या नोंदींचे डिजिटायझेशन झाले आहे. २०१६ वर्षाचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. लवकरच ते पूर्ण होईल. २०१७ पासूनचे कामकाज थेट ‘सीसीटीएनएस’ प्रणालीवरच होत आहे.
- दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव