गोव्यात महायुती अशक्य दिग्विजय सिंग यांची स्पष्टोक्ती
By Admin | Published: May 18, 2016 08:55 PM2016-05-18T20:55:55+5:302016-05-18T20:55:55+5:30
राज्यात गोवा फॉरवर्ड पक्षाला घेऊन महाआघाडी स्थापन करणे नजीकच्या भविष्यकाळात तरी शक्य नाही. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई यांनीच काँग्रेस पक्षात परतावे,
पणजी : राज्यात गोवा फॉरवर्ड पक्षाला घेऊन महाआघाडी स्थापन करणे नजीकच्या भविष्यकाळात तरी शक्य नाही. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई यांनीच काँग्रेस पक्षात परतावे, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. चर्चिल आलेमाव यांना काँग्रेस प्रवेश हवा असेल, तर न्यायालयात अगोदर त्यांचे निर्र्दोषत्व सिद्ध व्हावे, असे ते म्हणाले.
दिग्विजय सिंग व चेल्लाकुमार गुरुवारी गोव्यात दाखल झाले. येथील चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीस मार्र्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिग्विजय सिंग म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणी नेते काँग्रेसमध्ये परतत असतील, तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. वास्तविक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ही वेळ आहे. गोव्यात महाआघाडी शक्य दिसत नाही. त्यामुळे विजय सरदेसाई यांनी काँग्रेसमध्ये परतावे. चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेस प्रवेशासाठी अर्ज केलेला नाही; पण ते मला भेटले होते. त्यांच्याविरुद्ध लुईस बर्जर लाच प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र आहे. अगोदर न्यायालयात त्या खटल्याचा निकाल लागू द्या, असे मी चर्चिलना सांगितले आहे.
दिग्विजय सिंग यांनी आम आदमी पक्षाविषयी बोलताना सांगितले की, हा पक्ष गोव्यात काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना स्वत:कडे ओढू पाहत आहे. ‘आप’ म्हणजे भाजपची ‘बी-टीम’ आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ते सिद्ध केले आहे. (खास प्रतिनिधी)
प्रतिमा पाहून तिकीट
गोवा विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना दिग्विजय सिंग म्हणाले की, गोव्यातील काँग्रेसमध्ये जुने व नवे असा वाद नाही. आम्ही युवकांनाही प्रोत्साहन देऊ; पण त्यांना निवडणुकीवेळी किती टक्के जागा दिल्या जातील, ते आम्ही सांगू शकणार नाही. तिकीट वाटप करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आम्ही आता सुरू करत आहोत. अशावेळी इच्छुक उमेदवाराची कार्यक्षमता, प्रतिमा आणि जिंकण्याची क्षमता विचारात घेतली जाईल. आम्ही काँग्रेसच्या प्रत्येक गट समितीला प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षाकडे पाठविण्यास सांगू. ही नावे मग जिल्हा समितीकडे पाठविली जातील व त्यानंतर तिकीट वाटपाची पुढील प्रक्रिया पार पडेल.