दीक्षाभूमी, चैत्यभूमीचा उल्लेख गायब

By admin | Published: April 2, 2016 01:32 AM2016-04-02T01:32:09+5:302016-04-02T01:32:09+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र डॉ. आंबेडकरांनी ज्या क्रांतिभूमीतून

Dikshitbhoomi | दीक्षाभूमी, चैत्यभूमीचा उल्लेख गायब

दीक्षाभूमी, चैत्यभूमीचा उल्लेख गायब

Next

- जितेंद्र ढवळे,  नागपूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र डॉ. आंबेडकरांनी ज्या क्रांतिभूमीतून जगाला सामाजिक समतेचा संदेश दिला, अशा नागपुरातील दीक्षाभूमीचा उल्लेख शासनाच्या दैनंदिनी-२०१६मध्ये घेण्यात आलेला नाही. इतकेच नव्हेतर, राज्यातील पर्यटनस्थळांच्या यादीत मुंबईतील चैत्यभूमीचाही उल्लेख नाही. एवढ्या महत्त्वाच्या नोंदी घेण्याचे राहून कसे गेले, असा सवाल विविध शासकीय कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे.
दीक्षाभूमीचा जागतिक स्तरावर विकास करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यामुळेच दीक्षाभूमीला ‘अ’ संवर्गातील पर्यटनस्थळाचा दर्जाही दिला आहे. शासकीय दैनंदिनीत पृष्ठ क्रमांक १९९ ते २०५पर्यंत राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिली आहे. यात पृष्ठ क्रमांक २०५वर २४व्या क्रमांकात नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची नावे दिली आहेत. यात खिंडसी तलाव आणि रामटेकचा उल्लेख आहे. मात्र लाखो बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘दीक्षाभूमी’चा उल्लेख नाही. इतकेच काय तर नागपूरनजीकच्या कामठी येथील ड्रॅगन पॅलेसचाही उल्लेख नाही. पृष्ठ क्रमांक १९९वर मुंबईतील पर्यटनस्थळांच्या यादीत केवळ छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एलिफंटाचा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु चैत्यभूमीचा उल्लेख नाही.
दैनंदिनीमध्ये पृष्ठ क्रमांक १४५ ते १५८ दरम्यान राज्यातील लोकसभा सदस्यांची मतदारसंघ आणि संवर्गनिहाय यादी देण्यात आली आहे. यात १२व्या क्रमांकावर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले अशोक नेते यांचा संवर्ग ‘अजा’ (अनुसूचित जाती) असा दर्शविण्यात आला आहे. मुळात हा लोकसभा मतदारसंघ अज (अनुसूचित जमाती)साठी राखीव आहे.
नेतेही ‘अज’ याच संवर्गातून निवडून आले आहेत. असे असताना त्यांच्या नावापुढे ‘अजा’ कसे लावण्यात आले? दिंडोरी मतदारसंघातून निवडून आलेले हरिश्चंद्र चव्हाण, पालघर मतदारसंघातून निवडून आलेले अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या नावापुढे अजा (अनुसूचित जाती) हा संवर्ग दर्शविण्यात आला आहे. मुळात हे मतदारसंघ अज (अनुसूचित जमाती) या संवर्गासाठी राखीव आहेत.
इंग्रजी यादीतही ही चूक झाली आहे.

खडसे ‘कोथळी’चे की ‘कोठाली’चे?
दैनंदिनीमध्ये (पृष्ठ क्रमांक १४५ वर) रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा पत्ता मु. पो. कोठाली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव असा आहे. तर विधानसभा सदस्यांच्या यादीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा पत्ता मु. पो. कोथळी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव दर्शविण्यात आला आहे.

नागपूरची ओळख ‘नारंगी’ शहर
नागपूर येथील संत्र्यांमुळे नागपूर ‘नारंगी’ शहर म्हणून ओळखले जाते, असे शासकीय दैनंदिनीत नमूद करण्यात आले आहे. मुळात नागपूरची ओळख जगात ‘संत्रानगरी’ अशी असताना दैनंदिनी तयार करणाऱ्यांनी ‘नारंगी’ शब्दाचा शोध कोठून लावला? इंग्रजी भाषेतील दैनंदिनीमध्ये मात्र नागपूरचा ‘आॅरेंज सिटी’ असा अचूक उल्लेख आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने दीक्षाभूमीचा जागतिक स्तरावर विकास करण्याचेही स्पष्ट केले आहे. अशा वेळी दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीचा शासकीय दैनंदिनीत उल्लेख करण्याचा विसर प्रकाशकाला कसा पडला, याचे स्पष्टीकरण द्यावे.
- कृष्णा इंगळे, अध्यक्ष, कास्ट्राइब कर्मचारी महासंघ

Web Title: Dikshitbhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.