दिलीप सोपलांचे विधीमंडळात मौन; प्रणिती शिंदे जोरात !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 02:01 PM2019-09-04T14:01:03+5:302019-09-04T14:03:42+5:30
पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी ६६ प्रश्न उपस्थित केले. तर प्रणिती शिंदे यांनी ६१ प्रश्न विचारले. सिद्धाराम म्हेत्रे यांनी अवघा एक प्रश्न उपस्थित केला
मुंबई - 'बार्शी तिथे सर्शी' या म्हणीमुळे प्रसिद्ध असलेली बार्शी सध्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आली आहे. बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेची वाट धरली. तर शिवसेना नेते राजेंद्र राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या विधीमंडळातील कामगिरीची आकडेवारी आली आहे. या आकडेवारीनुसार दिलीप सोपलांची विधीमंडळातील कामगिरी शून्य दाखविण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या अधिवेशानात आमदार दिलीप सोपल यांनी बार्शीच्या समस्यांसंदर्भात विधीमंडळात एकही प्रश्न उपस्थित केला नाही. अर्थात शिवसेना प्रवेश करणार असल्यामुळे तर त्यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला नसेल ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील विधानसभा मतदार संघातील आमदारांनी एकूण २५६ प्रश्न उपस्थित केले.
सोलापूर जिल्ह्यातून विधीमंडळात सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये भारत भालके आणि प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी ६६ प्रश्न उपस्थित केले. तर प्रणिती शिंदे यांनी ६१ प्रश्न विचारले. सिद्धाराम म्हेत्रे यांनी अवघा एक प्रश्न उपस्थित केला. तसेच सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी विधीमंडळात ९४ टक्के हजेरी लावली. तर आमदार दिलीप सोपल यांनी बार्शीच्या प्रश्नांवर विधीमंडळात मौन राखले.