‘ध्येय पूर्णत्वासाठी परिश्रम अत्यावश्यक’
By admin | Published: March 3, 2017 04:14 AM2017-03-03T04:14:16+5:302017-03-03T04:14:16+5:30
आपल्या आयुष्यातील ध्येय, संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कठीण परिश्रम करणे अत्यावश्यक आहे
ठाणे : आपल्या आयुष्यातील ध्येय, संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कठीण परिश्रम करणे अत्यावश्यक आहे. केवळ शैक्षणिक दर्जा न उंचावता भावनात्मक आरोग्य जपत मुलांचा संपूर्ण विकास साधला पाहिजे, असे मत कल्याण सिटीजन एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त आणि कुमारमंगलम बिर्ला यांची पत्नी नीरजा बिर्ला यांनी व्यक्त केले.
कल्याणच्या बिर्ला स्कूलमध्ये मंगळवारी रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी शैक्षणिक संस्थेचा आढावा घेऊन संस्थेच्या प्रगतीचे मूल्यांकन केले. तसेच शालेय जीवनावर आधारित मांडण्यात आलेले प्रदर्शन पाहिले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा त्यांनी आनंद घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
बिर्ला महाविद्यालयाला दिलेल्या भेटीत नीरजा बिर्ला यांनी पदवीधरांच्या दीक्षान्त सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवले. २०१५-२०१६ च्या पदवीधरांना त्यांच्या हातून पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी जीवनात जिज्ञासा, धाडस, दृढविश्वास, जिद्द आणि संकल्प हे गुण अंगी असणे कसे गरजेचे आहे, हे पटवून दिले. हेन्री फोर्ड यांचे उदाहरण देऊन आपल्यासाठी या विश्वाने जे केले, त्यापेक्षा जास्त आपण या विश्वासाठी करावे, हेच खरे यश आहे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. (प्रतिनिधी)
>बिर्ला महाविद्यालयात दीक्षान्त सोहळ्यात पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना नीरजा बिर्ला.