एक मनस्वी कलाकार हरपला
By admin | Published: February 4, 2016 01:40 AM2016-02-04T01:40:25+5:302016-02-04T01:40:25+5:30
अरुणा भटचा स्वभाव काहीसा भांडखोर किंवा स्पष्टवक्तेपणासारखा होता; पण त्यामागे तिची कलाकारांविषयी आपुलकी आणि तळमळ होती
पुणे : अरुणा भटचा स्वभाव काहीसा भांडखोर किंवा स्पष्टवक्तेपणासारखा होता; पण त्यामागे तिची कलाकारांविषयी आपुलकी आणि तळमळ होती. पेन्शनचा प्रश्न असो की मानधनाचा विषय असो, ती आपणहून पुढाकार घेऊन यासाठी झगडायची. वेळप्रसंगी ती शासनालाही जाब विचारण्याची हिंमत दाखवायची, अशा शब्दांत नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी अरुणा भट यांना श्रद्धांजली वाहिली.
नाट्य परिषद पुणे शाखेच्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मी अरुणा भट यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी बुधवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लीला गांधी, सदानंद चांदेकर, स्वरूपकुमार, दादा पासलकर, ज्योती चांदेकर, सुहासिनी देशपांडे, रजनी भट, परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, मुकुंद शेवते, श्रीराम रानडे, सुनील महाजन आणि प्रमोद आडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वरूपकुमार म्हणाले, की नाट्य-चित्रपटसृष्टीमध्ये दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे तशी दुर्मिळ गोष्ट आहे; पण नाट्य परिषद मुंबई शाखेकडून मला जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला ती गोष्ट तिने मला सर्वप्रथम दूरध्वनी करून सांगितली. तिच्याबरोबर ‘घरोघरी हीच बोंब’ आणि ‘गुंतता पुरुष’ या नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तीन-चार दिवसांच्या आजारपणात ती जाईल, असे कुणालाच वाटले नाही.
ज्योती चांदेकर म्हणाल्या, की अरुणा म्हणजे अत्यंत लाघवी आणि हसरे व्यक्तिमत्त्व होते. तिचे हास्य खळखळत्या झऱ्यासारखे होते. खूप घनिष्ठ मैत्रिणी नसलो तरी एक ॠणानुबंध जुळला होता.
सुहासिनी देशपांडे यांनी पेन्शनबाबत शासनाला जाब विचारण्याच्या अरुणाने केलेल्या धाडसाची आठवण सांगितली. सर्व कलाकारांच्या अडचणी सोडविणे हा तिचा स्थायिभाव होता. पुढच्या व्यक्तीला उभारी देण्याचे सामर्थ्य तिच्यात होते, असेही त्या म्हणाल्या.
अरुणा माझी सावली होती, प्रत्येक गोष्टीमध्ये तिचे परफेक्शन होते, असे रजनी भट यांनी सांगून दु:खाला मोकळी वाट करून दिली.