दिलीप देशमुख ‘मांजरा’चे संचालक म्हणून अपात्र
By admin | Published: March 11, 2017 12:46 AM2017-03-11T00:46:28+5:302017-03-11T00:46:28+5:30
मांजरा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकीतील माजी मंत्री, आमदार दिलीप देशमुख यांचा उमेदवारी अर्ज रद्द करून संचालक
लातूर : मांजरा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकीतील माजी मंत्री, आमदार दिलीप देशमुख यांचा उमेदवारी अर्ज रद्द करून संचालक म्हणून ते अपात्र असल्याचा निर्णय येथील सहकार न्यायालयाने गुरुवारी दिला आहे, अशी माहिती याचिकाकर्ते अॅड. बळवंत जाधव यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
उत्पादक, बिगर उत्पादक व पणन मतदार गटातून आ. दिलीप देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अॅड. बळवंत जाधव यांनी त्यांच्या उमेदवारीस आक्षेप घेतला होता. आ. देशमुख हे मांजरा साखर कारखान्याप्रमाणे समान उद्देश असलेल्या जागृती साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आहेत. त्यामुळे ‘मांजरा’ची निवडणूक त्यांना लढविता येणार नाही, असा आक्षेप अॅड. जाधव यांचा होता. मात्र तत्कालीन पीठासन अधिकारी प्रताप काळे यांनी त्यांचा आक्षेप फेटाळून देशमुख यांचा अर्ज मंजूर केला होता. सध्या आ. देशमुख मांजरा साखर कारखान्याचे संचालक आहेत.
परिणामी, अॅड. जाधव यांनी सहकार न्यायालयात याचिका धाव घेतली. त्यावर न्यायालयाने गुरुवारी मांजरा कारखान्याचे उमेदवार म्हणून आ. दिलीप देशमुख यांना अपात्र घोषित केले असल्याचे अॅड. बळवंत जाधव यांनी पत्रपरिषदेत सांगितले. तथापि, निर्णयास न्यायालयाने ६० दिवसांची स्थगिती दिली आहे.(वार्ताहर)
वरच्या कोर्टात दाद मागणार
सहकार न्यायालयाने ६० दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे वरच्या कोर्टात दाद मागण्याचा अधिकार आहे. तिथे आम्हाला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया दिलीप देशमुख यांनी दिली.
सहकार न्यायालयाच्या या निर्णयानंतर आ. दिलीपराव देशमुख यांनी वरच्या न्यायालयात अपिलात न जाता नैतिकता बाळगून राजीनामा द्यावा.
- अॅड. बळवंत जाधव