दिलीप पाटीदार ८ वर्षांपासून बेपत्ता
By admin | Published: May 21, 2016 05:31 AM2016-05-21T05:31:06+5:302016-05-21T05:31:06+5:30
मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत.
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या गायब होण्यामागे पाटीदार कुटुंबाने महाराष्ट्रातील दोन एटीएस अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्याच्या गृहमंत्रालयाच्या परवानगीची गरज आहे. दिलीप पाटीदार यांची पत्नी पद्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
पद्मा म्हणाल्या की, ११ नोव्हेंबर २००८ रोजी मध्य प्रदेशातून पाटीदार यांना महाराष्ट्र एटीएसने मालेगाव स्फोट प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर दिलीप पाटीदार यांचे काय झाले? याची कोणालाच माहिती नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी पाटीदार कुटुंबाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सीबीआय तपासात महाराष्ट्र एटीएसचे काही अधिकारी दोषी असल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण इंदूरच्या सीबीआय कोर्टापुढे गेले. मात्र महाराष्ट्र एटीएसच्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याच्या कारणास्तव सीबीआयनेही या प्रकरणात हात झटकले. तपासाला गती मिळावी म्हणून पाटीदार कुटुंबाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र एटीएसच्या त्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगी गृहविभागाने द्यावी, अशी त्यांची मागणी होती. तत्काळ मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली नाही, तर पुन्हा सीबीआय कोर्टात जाण्याचा इशारा दिलीप पाटीदार यांचे भाऊ रामस्वरूप पाटीदार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
>खुनाचा संशय
एटीएस अधिकाऱ्यांनी दिलीप
यांचा खून केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी व्यक्त केला आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत रामस्वरूप म्हणाले की, २००८ साली एटीएसने दिलीपला ताब्यात घेतले. त्या वेळी आठवड्याभरात दिलीपसोबत दोनदा फोनवर बोलणे झाले. काही सेकंदाच्या त्या संवादात दिलीपने केवळ एटीएससोबत मुंबईत असल्याचे सांगितले.
मात्र त्या वेळी त्याच्या आवाजातून तो घाबरलेला असल्याचे जाणवले. मात्र दुसऱ्या आठवड्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्या वेळी पोलिसांनी विचारणा केली असता दिलीप निर्दोष असल्याचे समजताच त्याला मुंबईतून मध्य प्रदेशसाठी ट्रेनमध्ये रवाना केल्याचे उत्तर मिळाले. मात्र पोलिसांच्या या उत्तरावर विश्वास नसून त्यांनीच दिलीपचे काही बरे-वाईट केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी केला आहे.