मालेगाव स्फोट प्रकरणी ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार 8 वर्षांपासून गायब
By admin | Published: May 20, 2016 04:00 PM2016-05-20T16:00:30+5:302016-05-20T19:29:30+5:30
मालेगाव स्फोट प्रकरणी मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलेले दिलीप पाटीदार गायब झाले आहेत
Next
>
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 20 - मालेगाव स्फोट प्रकरणी मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलेले दिलीप पाटीदार गायब झाले आहेत. महाराष्ट्र एटीएसने 2008मध्ये कारवाई करत मालेगाव स्फोट प्रकरणी चौकशीसाठी दिलीप पाटीदार यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानंतर दिलीप पाटीदार यांचं काय झालं ? याची कोणलाच माहिती नाही. गेल्या 8 वर्षापासून दिलीप पाटीदार यांची काहीच माहिती मिळालेली नाही.
दिलीप पाटीदार यांचं कुटुंबीय मुंबईत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तपासाची मागणी केली आहे. पाटीदार यांच्या पत्नी पद्मा पाटीदार यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना एटीएसच्या अधिका-यांनी माझ्या पतीला सहज चौकशीसाठी 8 वर्षापुर्वी नेले तेव्हापासून त्यांचा मला काहीच पत्ता लागलेला नाही अशी माहिती दिली आहे. दुस-या दिवशी पतीने फोन करुन मुलाची काळजी घे असं सांगितलं, हा त्यांच्याशी झालेला शेवटचा संवाद असंही पद्मा पाटीदार यांनी सांगितलं आहे.
'आम्ही आमच्या सहा महिन्यांच्या बाळासह इंदूरच्या बंगाली चौकातील शांती विहार कॉलनीमध्ये राहत होतो. 11 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिका-यांसह महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) काही अधिकारी आमच्या घरी आले आणि मालेगाव स्फोट प्रकरणी माझ्या पतीला चौकशीसाठी घेऊन गेले. त्यादिवसापासून गेल्या 8 वर्षात माझ्या पतीचा काहीच ठावठिकाणा समजलेला नाही', असं पद्दा पाटीदार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं आहे.
महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपवावं अशी मागणी दिलीप पाटीदार यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.