शिल्पा-राज कुंद्राला हायकोर्टाचा दिलासा
By admin | Published: July 4, 2017 05:35 AM2017-07-04T05:35:32+5:302017-07-04T05:35:32+5:30
फसवणूकप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध दोन आठवडे दोषारोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश,
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फसवणूकप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध दोन आठवडे दोषारोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश, उच्च न्यायालयाने पोलिसांना सोमवारी दिले.
फसवणूकप्रकरणी ठाणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी, शिल्पा व राज कुंद्राने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. टेक्सटाईल फर्मच्या मालकाचे २४ लाख रुपये बुडविल्याप्रकरणी, २७ एप्रिल रोजी भिवंडी पोलिसांनी शिल्पा व राजवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. मे महिन्यात ट्रायल कोर्टाने दोघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर केला. सोमवारी उच्च न्यायालयाने पोलिसांना या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
चादर व्यापारी रवी बलोटिया यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी बीडीटीव्ही या शिल्पा व राजच्या टेलिशॉपिंग कंपनीद्वारे २४ लाख रुपयांच्या चादरी विकल्या. मात्र, त्याचे पैसे कंपनीने दिले नाहीत. त्यावर शिल्पा व राजच्या वकिलांनी दोघांचेही तक्रारदाराला फसविण्याचा हेतू नसल्याचे सांगितले. तसेच तक्रारदाराला एक कोटी रुपये दिले असून, केवळ २४ लाख रुपये शिल्लक राहिल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.