ट्रम्पेट चिन्हामुळे आंबेगावमध्ये विजयाला हातभार? दिलीप वळसे पाटील म्हणाले, "होय माझ्या इथे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 19:26 IST2024-11-25T19:19:44+5:302024-11-25T19:26:51+5:30

राज्यभरात पिपाणी आणि तुतारी चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसलेला असताना दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं.

Dilip Walse Patil admits that the trumpet symbol benefited him in the Maharashtra Assembly Elections | ट्रम्पेट चिन्हामुळे आंबेगावमध्ये विजयाला हातभार? दिलीप वळसे पाटील म्हणाले, "होय माझ्या इथे..."

ट्रम्पेट चिन्हामुळे आंबेगावमध्ये विजयाला हातभार? दिलीप वळसे पाटील म्हणाले, "होय माझ्या इथे..."

Maharashtra Assembly Election Result 2024 : आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निसटता विजय मिळविला. दिलीप वळसे पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा १५२३ मतांनी पराभव केला आहे. शरद पवार यांनी देवदत्त निकम यांच्यासाठी सभा घेत वळसे पाटलांवर जोरदार टीका केली होती. दुसरीकडे, राज्यभरात पिपाणी आणि तुतारी चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. खुद्द दिलीप वळसे पाटील यांनीच याची कबुली दिली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. बैठकीसाठी मी आलो असल्याचं वळसे पाटलांनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचा मला लाभ झाल्याची कबुली दिली आहे.

शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही  ट्रम्पेट चिन्हाचा फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा या नऊ मतदारसंघातील शरद पवार गटाच्या  उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा जास्त मते ट्रम्पेटला मिळाली. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी ट्रम्पेटचा फायदा झाला असल्याचे म्हटलं.

शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांनी दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरील डमी उमेदवारामुळे तुमचा विजय झाला का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर वळसे पाटील यांनी ट्रम्पेटमुळे फायदा झाला असल्याचे म्हटलं. "हे खरे आहे की मला ट्रम्पेटचा लाभ झाला, माझ्या इथे ट्रम्पेटने मते घेतली. पण, इतर भागात तसा परिणाम झाला का ते मला माहिती नाही," असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, आंबेगाव मतदारसंघात शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती. देवदत्त निकम यांचा १५२३ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी ट्रम्पेट चिन्हाला २९६५ मते मिळाली. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले.

Web Title: Dilip Walse Patil admits that the trumpet symbol benefited him in the Maharashtra Assembly Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.