दिंडोशीतील तलावाची देखभाल महापालिका करणार
By admin | Published: November 2, 2016 02:13 AM2016-11-02T02:13:04+5:302016-11-02T02:13:04+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव म्हणजेच शांताराम तलावाची देखभाल आणि वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे.
मुंबई : मालाड पूर्वेकडील कुरारगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव म्हणजेच शांताराम तलावाची देखभाल आणि वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे सध्या खासगी संस्थेच्या ताब्यात असलेला हा तलाव आणि उद्यान लवकरच पालिकेच्या पी (उत्तर) विभाग कार्यालयाकडून ताब्यात घेतला जाईल. शिवाय तलावाचे दैनंदिन परिरक्षण व देखभालही महापालिका प्रशासन करणार आहे.
विजेसाठी मीटर बसविण्याचे काम महापालिकेकडून पूर्ण झाले असून, येथील उद्यानातील व तलावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आता सुरळीत होणार आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान संगोपनाच्या कामाच्या यादीत या उद्यानाचा समावेश केला आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत या उद्यानाची सुरक्षा, वीज व परिरक्षण होणार आहे. तर चालू आर्थिक वर्षात महापालिका उद्यान मध्यवर्ती यंत्रणेमार्फत उद्यानाचे सौंदर्यीकरण, तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भित्तीचित्र दर्शनी भागात बसविण्याचे काम केले जाईल, असे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले.
दिंडोशीमधील नगरसेवकांसोबत महापालिका अधिकाऱ्यांचा पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याचे प्रभू यांनी सांगितले. ते म्हणाले की, महापालिकेने विजेची व्यवस्था करत दैनंदिन परिरक्षणाचे काम सुरू केल्याने बागेमध्ये विहार करणाऱ्या नागरिकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. म्हाडामार्फत करण्यात आलेल्या शांताराम तलावाच्या बांधकामात काही दोष होते. त्यामुळे तलावातील पाण्याला दुर्गंधी येणे किंवा तलावातील मासे मरणे असे प्रकार घडत होते. मात्र यापुढे तलावाचे दुर्गंधीयुक्त पाणी दोषमुक्त करून स्वच्छ चांगले पाणी तलावात राहण्यासाठी फिल्टरेशन प्लांट बसवणे, तलावात आणि उद्यान परिसरात झाडांची लागवड व सौंदर्यीकरण करणे नादुरुस्त पाण्याचे कारंजे दुरुस्त करणे, तलावाची मालकी जिल्हाधिकाऱ्यांकडून मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे आणि तलावाची देखभाल व दुरुस्ती कायमस्वरूपी महापालिकेने करणे यासाठी मुख्यमंत्री व नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून फडणवीस यांकडे पाठपुरावा केला. (प्रतिनिधी)