सांगली सिव्हिलमध्ये धिंगाणा, नगरसेविका पुत्रास अटक
By admin | Published: August 18, 2016 08:58 PM2016-08-18T20:58:26+5:302016-08-18T20:58:26+5:30
डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन त्यांच्यावर चप्पल फेकणाऱ्या नगरसेविका पुत्रास विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली.
आनलाइन लोकमत
सांगली, दि. 18 : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल) वॉर्ड क्रमांक ४० मध्ये धिंगाणा घालत डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन त्यांच्यावर चप्पल फेकणाऱ्या नगरसेविका पुत्रास विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. अभिजित दत्तात्रय भोसले (वय ३२, रा. हनुमाननगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडलेली ही घटना वॉर्डाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अभिजित भोसले याच्या परिचयाचे रुग्ण सिद्राम कसाले हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६३ मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना वॉर्ड क्रमांक ४० मध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या, पण त्यांना हलविले नव्हते. त्यामुळे मंगळवारी रात्री भोसले रुग्णालयात गेला. वॉर्ड ४० मध्ये डॉ. सतीश गडदे होते. त्यांच्याशी भोसलेने हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर धाऊन गेला. कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांच्या अंगावरही तो धाऊन गेला. कसाले यांना वॉर्ड ४० मध्ये का आणले नाही, असे तो जोरजोराने ओरडत होता. तब्बल तीन ते चारवेळा त्यास वॉर्डातून बाहेर काढले होते. पण तरीही तो पुन्हा आत जात होता. बाहेर काढल्यानंतर त्याने पायातील चप्पल डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्यादिशेने फेकून मारली होती. त्याचा हा धिंगाणा वॉर्डाबाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
रुग्णालयात सातत्याने डॉक्टरांवर होत असलेल्या हल्लयाच्या घटनांचा निवासी (मार्ड) डॉक्टर संघटनेने निषेध करून अधिष्ठातांकडे तक्रार केली होती. अधिष्ठातांनी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याशी घटनेबाबत चर्चा केली. शिंदे यांनी गुन्हा दाखल करून संशयित भोसलेला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी डॉ. गडदे यांची फिर्याद घेऊन भोसलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी दुपारी त्यास अटक केली. त्याला न्यायालयात उभे केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सायंकाळी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.
रखवालदार कशासाठी?
डॉक्टरांवर सातत्याने हल्ला होण्याच्या घटना घडल्याने रुग्णालयात खासगी रखवालदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण अशा घटनावेळी रखवालदार घाबरुन पुढे येत नाहीत. मग त्यांचा काय उपयोग? असा प्रश्न निर्माण होत आहे. महिन्याला लाखो रुपये त्यांना पगार दिला जात आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेऐवजी त्यांची रुग्णांच्या नातेवाईकांवर दादागिरी सुरू असते.