दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात धिंगाणा
By admin | Published: June 17, 2016 02:24 AM2016-06-17T02:24:10+5:302016-06-17T02:24:10+5:30
मदतीसाठी गेलेल्या पोलिसांनाच शिविगाळ करत मारहाण झाल्याची घटना वरळीत घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी सहा पोलिसांसोबत असभ्य वर्तन करत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांना
मुंबई : मदतीसाठी गेलेल्या पोलिसांनाच शिविगाळ करत मारहाण झाल्याची घटना वरळीत घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी सहा पोलिसांसोबत असभ्य वर्तन करत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यात समावेश असलेल्या २० वर्षीय तरुणीने दारुच्या नशेत सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला मारहाण केली.
गौरी भिडे (२०), चिराग बोहरा (२१), कपील राठोड (२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यामध्ये एका १७ वर्षीय मुलाचाही समावेश असून चौघही चेंबुर येथील रहिवासी आहे. चौघेही विद्यार्थी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गौरी आपल्या वडीलांच्या वर्ना कारने चिराग, कपील आणि अल्पवयीन मुलासह नाईट आऊटसाठी बाहेर पडली. चौघेही दारुच्या नशेत होते. चौघेही वरळी सी-फेसच्या दिशेने निघाले. दरम्यान तिचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी पोद्दार रुग्णालयाजवळील डिव्हायडरला धडकून फुटपाथवर चढली. गाडीचा अपघात झाल्याचे पाहून स्थानिकांनी गर्दी करत तिच्या बचावासाठी पुढाकार घेतला. मात्र गौरीने त्यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान तेथून जात असलेल्या पोलिसांच्या महिला दक्षता व्हॅनचे अपघाताकडे लक्ष गेले. यावेळी गाडीमध्ये ५५ वर्षीय एएसआय पाटील यांच्यासह तीन महिला हवालदार होत्या. पाटील यांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असता, गौरीने थेट त्यांनाच मारहाण करीत चावाही घेतला. ते पाहून इतर महिलांनी त्याकडे धाव घेतली. तेव्हा तिच्या मित्रांनी त्या पोलिसांनाच शिविगाळ करण्यास सुरुवात केली.
आणखी पोलीस कुमक मागवून चौघांनाही वरळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेव्हाही चौघांचा धिंगाणा सुरु होता. तेथे असलेल्या पोलिसांनाही गौरी आणि तिच्या सहकाऱ्यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तेथील सीसीटीव्हीचा सॉकेट ओढून त्यांचेही नुकसान केले. पोलीस ठाण्यातील संगणकही खाली पाडला. चौघांनाही सरकारी कामात अडथळा निर्माण करुन पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
- गौरी भिडे हिला ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनय कुलकर्णी
यांनी दिली.