डिंभे धरण उजव्या कालव्याला गळती
By admin | Published: August 25, 2016 01:40 AM2016-08-25T01:40:56+5:302016-08-25T01:40:56+5:30
पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात जलजागृती सप्ताह आयोजित करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला
घोडेगाव : राज्यभर पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात जलजागृती सप्ताह आयोजित करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आज जलसंपदा विभागाची धरणे भरल्यानंतर त्यांच्याच धरण व कालव्यांना असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आंबेगाव तालुक्यात शिनोली गावाजवळ घोड नदीवरून गेलेल्या डिंभे धरण उजवा कालव्याला लागलेल्या गळतीमुळे आजही मोठ्या प्रमाणात पाणी गळून वाया जात आहे.
सध्या धरण व कालव्यांना लागलेल्या पाणीगळतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून धरण व कालव्यांमधील गळती थांबविण्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही; त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. या गळतीमुळे धरणांना धोका निर्माण झाला आहे, तर कालवे फुटण्याची शक्यता कालव्यांजवळ राहणारे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ही गळती काढण्याचे काम तत्काळ केले
गेले नाही, तर भविष्यात मोठा बिकट प्रसंग ओढवू शकतो.
जलसंपदा विभागाने पाणीबचतीचा संदेश लोकांना देण्यापेक्षा स्वत: पाणीगळती थांबविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे व ही गळतीची कामे चांगली दर्जेदार केली पाहिजेत. पाणीगळती थांबली, तर पाणीटंचाईमध्ये या पाण्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. (वार्ताहर)
>कुकडी प्रकल्पातील डिंभे व माणिकडोह धरणांना मोठ्या प्रमाणात गळती आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाहून जाते. तसेच, सध्या आंबेगाव तालुक्यातून गेलेल्या डिंभे धरण उजवा कालव्याला मोठी गळती सुरू आहे.
शिनोली गावाजवळ घोड नदीवरून गेलेल्या कालव्यातून सध्या धबधब्यासारखे पाणी पडत आहे. हे पाणी पडताना पाहून अनेकजण भीती व्यक्त करतात. सामाजिक कार्यकर्ते
व काँग्रेस आयचे तालुक्यातील नेते बी. बी. राक्षे यांनी ही गळती तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.