दिंड्यांचे पारंपरिक नियोजन थक्क करणारे
By admin | Published: June 18, 2017 03:00 PM2017-06-18T15:00:51+5:302017-06-18T15:00:51+5:30
दिंडीकऱ्यांचे पांरपारिक नियोजन आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातील व्यवस्थापन शास्त्र शिकणाऱ्यांना आचंबित करणारे ठरले.
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 18 - तंबू उभारण्याचे पाईप दिंडीच्या वाहनाला (ट्रक) बांधलेले... हौद्यात दोन्ही बाजुला लटकवलेल्या पिशव्या...हौद्यात फळ्या लावून वरच्या बाजुस विश्रांतीसाठी केलेली व्यवस्था...ठिकठिकाणच्या मुक्कामावेळी गरज भासणारी भोजन सामग्री...आषाढी वारीच्या वाटेवर श्री क्षेत्र देहू, आळंदी ते पंढरपूरपर्यंतच्या १८ दिवसांच्या पायी वारीच्या प्रवासात आवश्यक असे सर्व साहित्य तेसुद्धा अत्यंत पद्धतशीर ठेवलेले. आवश्यकतेनुसार वस्तू सहज मिळावी, अशा स्वरूपात त्या वस्तुंच्या जागा निश्चित,जिथल्या तिथं वस्तू ठेवण्याचे दिंडीकऱ्यांचे पांरपारिक नियोजन आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातील व्यवस्थापन शास्त्र शिकणाऱ्यांना आचंबित करणारे ठरले. निगडीतील भक्ती शक्ती चौकात संत तुकोबारायांचा पालखी सोहळा शनिवारी दाखल झाला. त्यावेळी दिंडीच्या वाहनांकडे पाहून अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी परेदशातून आलेले पाहुणेही सुसूत्रबद्ध नियोजन पाहून थक्क झाले. संताच्या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या वारकऱ्यांची देहू, आळंदी ते पंढरपूरपर्यंतची पायी वारी सुरू झाली आहे. उन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता मजल, दरमजल करीत मोठ्या भक्ती भावाने वारकरी पंढरपूरच्यादिशेने मार्गस्थ झाले आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन पिंपरी चिंचवडमध्ये झाले. निगडीतील भक्ती शक्ती चौकात महापालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. शहरातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी आकुर्डी येथील विठ्ठलमंदिरात विसावली. त्यावेळी दिंडीकऱ्यांची वाहने जागा मिळेल तेथे बाजुला उभी करण्यात आली. ही वाहने अर्थात वारकऱ्यांना पंढरपुरपर्यंत घेऊन जाणारे ट्रक पाहिल्यानंतर दिंडेकऱ्यांचे नियोजन किती चोख आणि उत्तम आहे, याची प्रचिती आली. औद्योगिकनगरीत एका वाहन उद्योगात कामानिमित्त स्पेनवरून आलेला एक परदेशी पाहुणा हा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून आला होता. खांद्यावर भगव्या पताका, कपाळी केशरी टिळा, डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला आणि टाळ, मृदंगाच्या निनादात मुखात हरिनामाचा गजर करणारे शिस्तबद्ध वारकरी पाहुन परेदशी पाहुणा थक्क झालाच, शिवाय बाजुला थांबलेल्या दिंडेकऱ्यांच्या वाहनांकडे पाहिल्यानंतर तो आचंबितच झाला. १६ जून ते ३ जुलै या १८ दिवसांच्या कालावधितील वारीसाठी प्रत्येक दिंडीचे नियोजन कसे असते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न परेदशी पाहुण्याने केला. परेदशी पाहुण्यास सोहळा पाहाण्यासाठी घेऊन आलेल्या भारतातील एका सहकाऱ्याने शिरूर दिंडीतील एक विश्वस्त योगेश शिवले यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून व्यवस्थापन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
दिंडीच्या विश्वस्तांपैकी शिवले यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी दिंडीच्या व्यवस्थापनाबद्दल सांगितले. ते म्हणाले, ही शिरूर हवेलीची दिंडी असून हणुमंतभाऊ शिवले हे दिंडी प्रमुख आहेत. आषाढी वारीला जाण्याची तयारी सहा महिने आगोदर होते. वारीत सहभागी होणाऱ्यांची दरमहा बैठक घेतली जाते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तंबू बांधण्यापासून ते स्वयंपाक कोणी करायचा इथपर्यंतचे नियोजन केले जाते. वारीच्या कालावधित रोज फराळाचा मेनू काय असावा, पाण्याची व्यवस्था, आचारी,जेवण,फराळ याचे आणि खर्चाचे नियोजन केले जाते. त्याचबरोबर कपडे, पांघरून याचीही व्यवस्था केली जाते. ट्रकच्या एवढ्याशा जागेत दिंडीत सहभागी १०० ते १५० लोकांचे साहित्य ठेवले जाते. कचरा टाकण्यासाठी वाहनाच्या मागील बाजुस दोन पोती अडकवली आहेत. वारीत अगदी पंढरपूरपर्यंत कसलीच अडचण येणार नाही. अशा पद्धतीचे दिंडीकऱ्यांचे पारंपरिक नियोजन हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातील व्यवस्थापन शास्त्र शिकणाऱ्यांना नवा धडा देणारे असल्याच्या प्रतिक्रिया परदेशी पाहुण्याच्या तोंडून बाहेर पडल्या.