डिप्लोमा प्रथम वर्ष प्रवेशच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 02:36 AM2019-06-01T02:36:48+5:302019-06-01T02:37:01+5:30
प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी दहावीमध्ये किमान ३५ टक्के गुण मिळणारे विद्यार्थी पात्र ठरतात. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्ज नोंदणी आणि निश्चितीसाठी ३० मे ते १८ जूनपर्यंतची मुदत तंत्रशिक्षण संचलनालायकडून देण्यात आली आहे.
मुंबई : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पदविका (डिप्लोमा) प्रवेशाला सुरुवात केली जात असल्याने विद्यार्थी इतर शाखांमध्ये विखुरले जातात. त्याचा फटका पदविका प्रवेशाला मोठ्या प्रमाणात बसतो. हे लक्षात घेऊन यंदा एक महिना आधीच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारपासून या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली.
प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी दहावीमध्ये किमान ३५ टक्के गुण मिळणारे विद्यार्थी पात्र ठरतात. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्ज नोंदणी आणि निश्चितीसाठी ३० मे ते १८ जूनपर्यंतची मुदत तंत्रशिक्षण संचलनालायकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि तक्रार निवारणासाठी राज्यात ३५९ सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली ओहेत, अशी माहिती डीटीईचे संचालक अभय वाघ यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून खासगी महाविद्यालयांप्रमाणेच अनुदानित, शासकीय महाविद्यालयांतही पदविका अभ्यासक्रमांच्या जागा जागा रिक्त राहत आहेत. गेल्या वर्षी एक लाख २३ हजार जागांपैकी तब्बल ७१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाची अधिकाधिक
माहिती व्हावी, यासाठी तालुका स्तरावर तज्ज्ञांमार्फत चर्चासत्रे आणि मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन केल्याची माहिती वाघ यांनी दिली.
तंत्रनिकेतन पदविका वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी - ३० मे ते १८ जूनपर्यंत
कागदपत्रांची पडताळणी - ३० मे ते १८ जून (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
प्रथम मेरिट यादी - १९ जून
तक्रार दाखल करणे - २० जून ते २१ जून (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अंतिम मेरिट यादी जाहिर - २४ जून