ऊस उत्पादकांना टनास ४५ रुपये थेट अनुदान

By admin | Published: November 19, 2015 12:15 AM2015-11-19T00:15:10+5:302015-11-19T00:39:41+5:30

केंद्र शासनाचा निर्णय : देशातील ५३८ कारखान्यांना सशर्त फायदा

Direct donations of 45 rupees to sugarcane growers | ऊस उत्पादकांना टनास ४५ रुपये थेट अनुदान

ऊस उत्पादकांना टनास ४५ रुपये थेट अनुदान

Next

नवी दिल्ली/कोल्हापूर : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती टन ४५ रुपयांप्रमाणे थेट अनुदान देण्याचा निर्णय केंद्र शासनाने मंगळवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ऊस बिलाच्या रकमेपोटी थेट शेतकऱ्यालाच अनुदान देण्याचा प्रयोग भारतात प्रथमच होत आहे. जागतिक व्यापार संघटनांच्या निर्यात साखरेबाबतच्या जाचक अटींतून मार्ग म्हणून केंद्राने हे पाऊल उचलले आहे. देशातील खासगी व सहकारी अशा ५३८ कारखान्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
जे कारखाने हंगाम २०१५-१६ (म्हणजे १ आॅक्टोबर २०१५ ते ३० सप्टेंबर २०१६) या दरम्यान त्यांना निश्चित करून दिलेल्या निर्यात कोट्यातील किमान ८० टक्के साखर निर्यात करतील, त्याच कारखान्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाईल. वर्षाला देशाला २३० कोटी टन साखरेची गरज आहे; परंतु मागच्या चार वर्षांत साखरेचे उत्पादन जास्त झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातील साखरेचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे कारखान्यांचे अर्थकारणच बिघडले आहे. देशातील कारखान्यांकडे सध्या ६५०० कोटी रुपयांची शेतकऱ्यांच्या एफआरपीची थकबाकी असल्याचे केंद्र शासनाने म्हटले आहे. त्यामुळे ही स्थिती सुधारायची असेल, तर साखर निर्यातीशिवाय दुसरा सुलभ पर्याय नाही. म्हणून केंद्र शासनाने सर्वच कारखान्यांना एकूण उत्पादित साखरेच्या १२ टक्के साखर निर्यात करणे बंधनकारक केले आहे. त्यातील ऐंशी टक्के साखर निर्यात केल्यास हे अनुदान मिळू शकेल. एफआरपी देण्यासाठी जे सॉफ्ट लोन केंद्र शासनाने दिले ते देखील थेट शेतकऱ्यांच्याच खात्यावर जमा झाले. हे अनुदानही तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होणार आहे. ही रक्कम मूळ एफआरपीची भाग मानून तेवढी रक्कम त्या शेतकऱ्यास देय असलेल्या एफआरपीमधून कमी करण्यात येईल. ज्या कारखान्यांचे सरासरी हंगामातील गाळप पाच लाख टन आहे. त्यांना दोन कोटी २५ लाख रुपये या अनुदानापोटी मिळतील. या अनुदानामुळे शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देण्यास मदत होईल, असा दावा केंद्र शासनाने केला आहे.

इथेनॉल @ ४२ रुपये
इथेनॉल कारखान्याच्या ठिकाणीच (एक्स मिल) प्रती लिटर ४२ रुपये दर निश्चित करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदाही साखर कारखान्यांना होणार आहे. सध्या इथेनॉलला डेपो पोहोच ४९ रुपये दर मिळत होता. त्यातून वाहतूक आणि अबकारी कर वगळता कारखान्यांना प्रत्यक्षात ३८ ते ४० रुपये मिळत होते.
 

दृष्टिक्षेपात भारतातील साखर उद्योग
४एकूण कारखाने : ५३८
४साखरेचा सर्वाधिक वापर भारतात
४ब्राझीलनंतरचा सर्वांत मोठा साखर उत्पादक देश
४जागतिक साखर उत्पादनात ब्राझीलचा वाटा २२ टक्के, तर भारताचा १४ टक्के
४वार्षिक उलाढाल : पाच हजार कोटी
४ऊस उत्पादक : अडीच कोटी
४साखर उद्योग असलेली राज्ये :
महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, तमिळनाडू, पंजाब, कर्नाटक, बिहार आणि आंध्र प्रदेश.

Web Title: Direct donations of 45 rupees to sugarcane growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.