पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे ३० ठिकाणी थेट प्रक्षेपण
By Admin | Published: June 24, 2016 02:07 AM2016-06-24T02:07:32+5:302016-06-24T02:07:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तंत्रज्ञानप्रेम लक्षात घेऊन त्यांचा पुण्यातील २५ जूनचा कार्यक्रम हायफाय करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण शहरातील ३० महत्त्वांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तंत्रज्ञानप्रेम लक्षात घेऊन त्यांचा पुण्यातील २५ जूनचा कार्यक्रम हायफाय करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण शहरातील ३० महत्त्वांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या परराज्यांतील काही शहरांशी पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान संवाद साधणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत गुजरातमध्ये मोदी यांनी हायफाय तंत्रज्ञान असलेली एक स्वतंत्र वॉर रूमच तयार केली होती. एकाच वेळी अनेक ठिकाणी ते याद्वारे संवाद करू शकत होते. तीच यंत्रणा आता मोदींसाठी वापरण्यात येत असते. त्यांचे हे तंत्रज्ञानप्रेम लक्षात घेत केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने पुण्यातील कार्यक्रमातही त्याचा वापर केला आहे. हा कार्यक्रम दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. ते कव्हरेज अन्य दूरचित्रवाहिन्यांनाही देण्यास दूरदर्शनला सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या ३० चौकांमध्ये मोठे स्क्रिन लावून हा कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे. पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील शाळा, सभागृह, पालिकेची नाट्यगृहे यांचा त्यात समावेश आहे. काही भाजपा कार्यकर्त्यांकडून, दूरदर्शन संच विक्रेत्यांनाही ते क्रिकेट सामन्यांच्या वेळी दुकानांच्या दर्शनी भागात लावतात तसा दूरचित्रवाणी संच कार्यक्रमाच्या वेळी लावून ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
बालेवाडी क्रीडा संकुलात मुख्य सभागृहाशिवाय त्याच्या अगदी शेजारीच एक स्वतंत्र सभागृह राखीव ठेवण्यात आले आहे. मुख्य सभागृहातील आसनक्षमता संपल्यानंतर उर्वरित नागरिकांना या स्वतंत्र सभागृहात बसवण्यात येईल. तिथे त्यांच्यासाठी स्वतंत्र स्क्रिन लावण्यात आला आहे. व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंना दोन भव्य स्क्रिन
आहेत. त्यामुळे सभागृहाच्या अगदी अखेरच्या रांगेतील श्रोत्यालाही पंतप्रधान व्यवस्थित दिसू शकतील. या सर्व यंत्रणा तसेच ध्वनिक्षेपक व्यवस्था यांची वारंवार
चाचणी घेण्यात येत असून, थोडीही चूक राहू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते तंत्रज्ञांपर्यंत सगळे दक्ष आहेत.