अटल सेतूमार्गे थेट पुणे बंगळुरू नवीन हायवे; नितीन गडकरींचा प्लॅन, कसा असेल हा रोड?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:11 PM2024-09-16T12:11:32+5:302024-09-16T12:13:30+5:30
पुण्यातील वाहतूक कोंडी अन् स्मार्ट सिटी यावर नितीन गडकरींनी भाष्य केले.
पुणे - सध्याच्या काळात आधुनिक रस्ते आणि महामार्गामुळे अनेक शहरे एकमेकांना जोडली आहेत. प्रवासाचे अंतर कमी होत आहे. मात्र त्याचसोबत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अनेकदा वाहतूक कोंडी होते. पुण्यातही तीच परिस्थिती आहे. पुणे-बंगळुरू हायवेवरील कोंडीमुळे तासन्तास वाहने खोळंबतात. याच कोंडीतून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. मुंबई-बंगळुरू यामधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने नवीन हायवे बनवण्याचं ठरवलं असून त्याचे टेंडरही निघाल्याची घोषणा गडकरींनी केली.
पुण्यातील एका कार्यक्रमात मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे जेव्हा आम्ही बांधला त्यावेळी पुढचे ५० वर्ष आता काही समस्या नाही असं आम्ही म्हणायचो, आज माझा मुलगा आणि त्याची पत्नी पुण्याला येत होते, मी नागपूरहून पुण्यात पोहचलो पण ते लोणावळ्यात १ तास अडकले होते. बरं झालं आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे असं त्यांनी म्हटलं.
कसा असेल हा रोड?
अटल सेतूवरून उतरल्यानंतर तिथून थेट १४ लेनचा नवीन हायवे पुण्याच्या रिंगरोडला जोडून मुंबई ते बंगळुरू द्रुतगती महामार्गाचे काम पुढच्या सहा महिन्यात करायचं ठरवलेले आहे. या प्रकल्पाचे टेंडरही निघाले, कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवरील ५० टक्के वाहतूक त्या रोडवरून जाईल. अटल सेतूवरून तुम्ही नव्या पुणे एक्सप्रेसला लागले तर तिथून पुण्याच्या रिंगरोडला येणार आणि तिथून थेट बंगळुरूला जाणार. पुढे हाच रोड पुणे औरंगाबादला जोडणार, त्यामुळे पुण्याच्या आतमध्ये अडकणार नाही असं गडकरींनी सांगितले.
गडकरींचा पुणेरी टोला
भारतीयांचे तसं सायन्स, टेक्नोलॉजी, रिसर्च, इनोव्हेशन यात उत्तम काम आहे तसं लोकसंख्या कशी वाढवायची हे तंत्रज्ञानही फार उत्तम मिळालं आहे. त्यामुळे ऑटो मोबाईल आणि पॉप्युलेशन ग्रोथ कुणी कितीही प्रयत्न करा, थांबतच नाही. पुण्याचे जे चित्र आहे त्याचे खरे कारण कृषी अर्थव्यवस्थेकडे आपण दुर्लक्ष केले त्याचे हे परिणाम आहेत. स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे असा पुणेरी टोला नितीन गडकरींनी लगावला.