पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या प्रचाराची दिशा सोमवारी पुण्यात निश्चित होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 08:22 PM2019-03-13T20:22:28+5:302019-03-13T20:36:50+5:30
पुणे लोकसभा मतदार संघात १ हजार ९४४ बुथ असून, आतापर्यंत १ हजार ८१० बुथ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी पुढील दीड-दोन महिन्यातील प्रचाराची दिशा व राजकीय गणिते लक्षात घेण्यासाठी येत्या सोमवारी (दि. १८) रोजी फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची एकत्र समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपाचेपुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी शहर भाजपाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती गोगावले यांनी दिली. पुणे लोकसभा मतदार संघात १ हजार ९४४ बुथ असून, आतापर्यंत १ हजार ८१० बुथ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर १९ हजार ४५० बुथ प्रमुखांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय निवडणुकीच्या विविध कामांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान भाजपा उमेदवारी देताना जातीय समीकरणे लक्षात घेणार का या प्रश्नावर पुणे लोकसभा मतदार संघात भाजपा उमेदवारी देताना जातीचा मुद्दा महत्वाचा धरणार नाही. तर विकासाच्या मुददयावर निवडणुक होईल. भाज पक्ष देईल ती जबाबदारी घेण्यास तयार आहे, असे सांगत गोगावले यांनी स्वताच्या उमेदवारी बाबत भाष्य करणे टाळले.
------
निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर
पुणे लोकसभा मतदार संघाचे प्रभारी पदाची जबाबदारी आमदार योगेश सागर यांना देण्यात आली आहे. लोकसभा संयोजक दीपक मिसाळ ,सहसंयोजक दीपक पोटे , निवडणूक प्रमुख आमदार विजय काळे, सहप्रमुख मुरली मोहोळ, जाहीरनामा प्रमुख माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
----------------
संजय काकडे अद्यापही भाजपाचे
संजय काकडे भाजपाचे सहयोगी सदस्य खासदार असून, त्यांनी आतापर्यंत कोणतीही लेखी अथवा तोडी पक्षाचे पद सोडत असल्याचे कळविलेले नाही. यामुळे आजही संजय काकडे भाजपचेच आहे. यामुळे पक्ष कार्यालयातील बॅनरवरील त्यांचा फोटो काढण्यात आला नसल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.