...तर राजकारणाची दिशा वेगळी असती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 04:37 AM2017-04-10T04:37:33+5:302017-04-10T04:37:33+5:30

पक्ष बदलल्यानंतर माणसे रंग बदलतात. मात्र शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे

... but the direction of politics would have been different | ...तर राजकारणाची दिशा वेगळी असती

...तर राजकारणाची दिशा वेगळी असती

Next

मुंबई : पक्ष बदलल्यानंतर माणसे रंग बदलतात. मात्र शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे यांनी कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर केला नाही. राणेंचे नेतृत्व हे पक्षापलिकडले आहे हे त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर सिद्ध झाले. पण, त्यांनी शिवसेना सोडली नसती तर आज महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या दिशेने गेले असते, असे उद्गार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पासष्ठाव्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास गडकरींसह काँगे्रस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. गडकरी व सुशीलकुमार शिंदे यांच्यात राजकीय जुगलबंदी यावेळी पाहायला मिळाली.
राजकारणात राणेंचे व्यक्तीमत्व हे ‘सेल्फ मेड’ आहे. काँग्रेसमध्ये जाताना मी त्यांना म्हटले होते, की तुम्ही आगीतून सुटून फुफाट्यात जाताय. कारण सुशीलकुमार शिंदे यांना ठाऊक आहे, की हायकमांड हसली की आपल्यालाही हसावे लागते. हा स्वभाव राणेंचा नाही, त्यांना स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे, कर्तृत्व, क्षमता आहे. माणूस जेव्हा लढाईत हरतो तेव्हा तो पराभूत होत नाही पण, तो युद्धभूमी सोडून जातो तेव्हा हरतो. हे वाक्य नारायण राणेंच्या आयुष्यासाठी आहे, अशा शब्दांत गडकरी यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले.
राणेंबाबत फार अफवा आहेत की ते इकडे चालले, तिकडे चालले. पण नारायण राणे असा वेडावाकडा विचार करणार नाहीत, याची मला खात्री आहे, अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवरून राजकीय टोलेबाजी केली. काँग्रेसवाले हे घुसण्यात एक्सपर्ट असतात, आणि ते कुठे घुसून कोणाला बाहेर काढतील सांगता येत नाही. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचे बारीक लक्ष असते की एखाद्याला छळल्यानंतर, त्रास दिल्यानंतर माणूस काय करतो. राणेसाहेब या परीक्षेत यशस्वी झाल्याचे शिंदे म्हणाले. तर, मी कुठे जाणार याची माझ्यापेक्षा जास्त मीडियाला चिंता असते, असे सांगत आजवरचा राजकीय प्रवास बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच घडल्याची भावना राणे यांनी व्यक्त केली. मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच. तेव्हा बाळासाहेबांनी जो विश्वास टाकला तो कोणताच नेता टाकणार नाही. मी कोणत्याही पक्षात असलो किंवा गेलो तरी बाळासाहेबांचे स्थान अढळ आहे.
नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे. नाहीतर हा नोकरदार कोकणी माणूस महाराष्ट्राला कधी दिसला नसताच. मी जे ठरवतो तेच करतो, आणि कुणालाच घाबरत नाही. कारण प्रामाणिकपणे काम केले तर घाबरायचे कारण नाही, बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्याशी जसा बोलायचो, तसेच आज सोनिया गांधी, राहुल गांधींशी बोलतो. असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी)

...मग बजेट मांडले!
अर्थमंत्री असताना वजन कमी केले होते. त्यामुळे नेमका अर्थसंकल्प मांडताना व्यवस्थित होणारे कपडे नव्हते. योगायोगाने तत्कालीन विरोधीपक्ष नेते राणे यांना हे कळले. तत्काळ माझ्याकडे माप घेणारा माणूस आला आणि लागलीच दुसऱ्या दिवशी ११ वाजता नवा ड्रेस शिवूनही दिला. तोच सूट घालून मी अर्थसंकल्प मांडला.- जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते

पण रुबाब घालवू नका!
राणेसाहेब कुठेही गेला आणि काहीही झाले, तरी तुम्ही तुमचा रुबाब घालवू नका.
- रामराजे निंबाळकर, विधानपरिषद अध्यक्ष
 

Web Title: ... but the direction of politics would have been different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.