सर्व घटकांचा भ्रमनिराश करणारा दिशाहीन अर्थसंकल्प - अशोक चव्हाण
By Admin | Published: March 18, 2017 08:03 PM2017-03-18T20:03:47+5:302017-03-18T20:03:47+5:30
अर्थसंकल्प सर्वच घटकांचा भ्रमनिरास करणारा असून दिशाहीन आणि शेतकरीविरोधी असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - 'अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे पण कोणत्याही ठोस योजना नाहीत. शेतक-यांना कर्जमाफी न देता वा-यावर सोडले आहे. हा अर्थसंकल्प सर्वच घटकांचा भ्रमनिरास करणारा असून दिशाहीन आणि शेतकरीविरोधी असल्याची', टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
'अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज साडेचार हजार कोटीपेक्षा जास्तीच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे. सलग तिस-या वर्षी सरकारने तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे या वरून या सरकारला आर्थिक शिस्त नसून राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका', अशोक चव्हाण यांनी केली आहे. 'यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांना चांगले उत्पादन झाले होते, मात्र शेतीमालाला भाव मिळत नसल्याने मोठ्या संकटात असलेल्या शेतक-यांसाठी सरकार कर्जमाफीची घोषणा करेल अशी अपेक्षा होती. पण सरकारने राज्यातील शेतक-यांची फसवणूक केली आहे. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर, कामगार यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही उपाययोजना करेल अशी अपेक्षा होती पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी राज्यातील जनतेचा अपेक्षाभंग केला', असे चव्हाण म्हणाले.
'तरूण, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांसाठी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची आणि निधीची अपेक्षा होती. पण सरकारने या सर्व घटकांना निराश केले आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगारी कमी करण्यासंदर्भात कुठलीही नवी योजना जाहीर केली नाही. महिला विकास आणि सुरक्षेसाठी या अर्थसंकल्पात कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हातात काहीही पडले नसून राज्याला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे', असं अशोक चव्हाण बोलले आहेत.