कचराकुंडीतून थेट चित्रात... रस्त्यावरील कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तींना चक्क भिंतीवरील चित्रांमध्ये स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 05:43 PM2023-04-05T17:43:06+5:302023-04-05T17:43:20+5:30
प्रत्येक शहरात नगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील केरकचरा गोळा करण्यासाठी माणसे नेमलेली असतात. सदरची माणसे हि ठेकेदाराकडे काम करत असतात.
अजय बुवा / फोंडा
प्रत्येक शहरात नगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील केरकचरा गोळा करण्यासाठी माणसे नेमलेली असतात. सदरची माणसे हि ठेकेदाराकडे काम करत असतात. अत्यल्प अशी मजुरी त्याना मिळत असते. शिक्षित व समाजसुधारक लोकांनी निर्माण केलेला कचरा गोळा करून शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ह्या लोकांवर असते. प्रचंड दर्प व घाण असलेला कचरा हाताने गोळा करणे. पोत्यातून व्यवस्थित भरून कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचवण्याचे काम ही माणसे करत असतात. लोक त्यांना पाहून लांब राहतात कारण त्यांच्या अंगाला सुद्धा त्या कचऱ्यांचा दर्प येत असतो. अशा ह्या व्यक्तींचा योग्य तो सन्मान फोंडा नगरपालिकेने केला आहे. त्यांनी केलेल्या कष्टाचा एक प्रकारे यथोचित गौरव केलेला आहे.
नवीन तीन मजली मार्केट संकुल मध्ये सुंदरता आणण्यासाठी डाव्या बाजूची संपूर्ण मोठी भिंत ही चित्रमय करण्यात आले आहे .या भिंतीवर हवे तर महापुरुषांचे किंवा अन्य काही मोहक चित्रे काढता आली असती परंतु नगरपालिका व्यवस्थापनाने चक्क रस्त्यावरील कचरा गोळा करणाऱ्या लोकांची पोट्रेट्स इथे रंगवली आहेत. गुलाब मांजी ,दीपिका शिंदे व जारमन ऋषी या तीन कचरा गोळा करणाऱ्या लोकांची हुबेहुब चित्रे तिथे रेखाटली गेली आहेत. शहरात किमान 50 जण कचरा गोळा करत असतील. त्यातली सर्वात ज्येष्ठ अशा या तीन व्यक्ती. नगरपालिकेच्या ह्या कृतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कालानुरूप कचरा गोळा करणारी ही माणसे आपल्या गावी परत जातील. किंवा एक दिवस या जगाचा निरोप सुध्दा घेतील. परंतु भिंतीवरील त्या चित्रामुळे मात्र ती कायम फोंडावासियांच्या स्मरणात राहतील. प्रत्येक नगरपालिकेने लहानसहान कृती मधून आपली कृतज्ञता अशा माणसाबाबत व्यक्त केल्यास तो त्यांचा खरेच सन्मान होईल.
आज ज्या ज्या वेळी ह्या तीन व्यक्ती आपल्या चित्रांकडे पाहत असतील त्यावेळी त्यांना खरेच धन्य झाल्यासारखे वाटत असेल. कचराकुंडीतून थेट चित्रात असा स्वप्नवत प्रवास त्यांचा झालेला आहे. फोंड्यातील नागरिक सुध्दा त्या चित्रमय भिंतीकडे कौतुकास्पद नजरेतून पाहत आहेत.