पोलिस महासंचालक रजनीश सेठ MPSC चे नवे अध्यक्ष?; फाइल निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 08:16 AM2023-09-21T08:16:50+5:302023-09-21T08:17:24+5:30

एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती.

Director General of Police Rajnish Seth MPSC New Chairman?; File to Chief Minister for decision | पोलिस महासंचालक रजनीश सेठ MPSC चे नवे अध्यक्ष?; फाइल निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे

पोलिस महासंचालक रजनीश सेठ MPSC चे नवे अध्यक्ष?; फाइल निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे

googlenewsNext

यदु जोशी 

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी सध्याचे राज्य पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीचा चेंडू आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात आहे. 

एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविली. या तिघांमध्ये रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात सेठ यांचे नाव आघाडीवर आहे.  

यापूर्वीही आयपीएस अधिकाऱ्यांनी हे पद महाराष्ट्रात भूषविलेले आहे. रजनीश सेठ यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली होती. ते येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होणार होते. मात्र, आता ते एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून नवीन इनिंग सुरू करण्याची शक्यता आहे. वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत ते या पदावर राहू शकतील. 

आयोगाचे विक्रमी काम  
किशोरराजे निंबाळकर यांना एमपीएससी अध्यक्ष म्हणून १ वर्ष ११ महिन्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळाला. त्यात विक्रमी काम आयोगाने केले. २०२१ मध्ये आयोगाने २७५ जाहिराती दिल्या, पदसंख्या होती ५ हजार ४७, मुलाखती घेतल्या ७७९ आणि शिफारशी केल्या ९९. २०२२ मध्ये १०८ जाहिराती आयोगाने दिल्या. पदसंख्या होती, ६५७६, मुलाखती घेतल्या ७४१९ आणि शिफारशी केल्या ४९७७. तसेच, २०२३ मध्ये ६० जाहिराती दिल्या, पदसंख्या होती १० हजार ५२९ , मुलाखती घेतल्या ९३३५ आणि नोकरीसाठी शिफारशी केल्या ३९२८.

...तर नवीन महासंचालक कोण? 
रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास नवीन महासंचालक कोण होणार याचीही चर्चा रंगणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या सेवेत (महासंचालक इंडो-तिबेट सीमा पोलिस) असलेल्या रश्मी शुक्ला यांना संधी मिळू शकते. रजनीश सेठ १९८८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. या तुकडीच्या रश्मी शुक्ला या एकच अधिकारी आहेत. जून २०२४ मध्ये त्या निवृत्त होतील. या निमित्ताने राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Director General of Police Rajnish Seth MPSC New Chairman?; File to Chief Minister for decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.