पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालक आता थेट ऑनलाईन भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 06:00 AM2021-08-22T06:00:15+5:302021-08-22T06:00:26+5:30
राज्य पोलीस मुख्यालयातील कामात गती व पारदर्शकता आणण्यात अप्पर महासंचालक राजेंद्रसिंह, संजीवकुमार सिंघल, संजयकुमार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
- डॉ. खुशालचंद बाहेती
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्याच्या पोलीस महासंचालकांना भेटण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केल्यामुळे दररोज अनेक अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन अडचणींचे निराकरण करून घेत आहेत. आता तर संजय पांडे व सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस शिपायांनासुद्धा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.
राज्य पोलीस मुख्यालयातील कामात गती व पारदर्शकता आणण्यात अप्पर महासंचालक राजेंद्रसिंह, संजीवकुमार सिंघल, संजयकुमार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. कधीकाळी राज्याच्या पोलीस मुख्यालयात कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवेश करणे व आपल्या नोकरी विषयक अडचणीसाठी वरिष्ठांची भेट होणे, भेट झालीच तर अडचणींचे निराकरण होणे हे दुरापास्तच होते. या अडचणी, अडचणींचे ‘अर्थ ‘व दगडात बांधकाम असलेली इमारत या पार्श्वभूमीवर अनेकजण याचा उल्लेख दगडीचाळ असा करीत. सध्या मात्र सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य पोलीस मुख्यालयाची दारे सताड उघडी आहेत. इतकेच नव्हे तर सर्व प्रकरणांची माहिती मुक्तपणे देण्यात येत आहे.
पूर्वीची पद्धत
n महासंचालक कार्यालयात जाण्यापूर्वी परवानगीसाठी अर्ज व मुख्यालयातून दिलेल्या वेळेतच भेट.
n आठवड्यात फक्त १ दिवस मर्यादित लोकांच्या मुलाखती.
n अनेकवेळा अर्ज महासंचालक कार्यालयात पोहोचत नसे किंवा पोहोचला तर वेळ दिली जात नसे.
n मुलाखत झाली तरी निराकरणाचा कालबद्ध कार्यकाल नसे.
अर्जाची पद्धत
n परवानगीची आवश्यकता नाही.
n मुलाखतीसाठी येणाऱ्यांसाठी विश्रागृहात थांबण्याची सोय.
n कामकाजाच्या दिवशी दररोज मुलाखत.
n सकाळच्या सत्रात नाव नोंदणी करून आपला अर्ज द्यावा लागतो.
n दररोज पावणे तीन वाजता सभागृहात अर्जाच्या सर्व माहिती व संचिकेसह संबंधित अधिकारी हजर.
n बदली, पदोन्नतीच्या यादीत नाव आहे काय, किती क्रमांकावर आहे, कोणत्या ठिकाणचा प्रस्ताव आहे या माहितीचे मुक्तपणे वितरण.
n ३ वाजता महासंचालक व इतर वरिष्ठ सभागृहात.
n प्रत्येकाचे गाऱ्हाणे ऐकून संचिकेतील माहिती घेऊन कालबद्ध निराकरण दिलेल्या कालावधीत काम झाले नाही तर पुन्हा भेटण्याची तारीख निश्चित.
n अर्जावरच निर्णयाची नोंद . यामुळे पुन्हा संचिकेत टीपणी लिहून अनेक टेबलवर फिरण्याची आवश्यकता नाही.
n एखाद्याने एकट्याने भेटण्याची विनंती केली तर यासाठी वेळ देण्यात येतो.
राज्य पोलीस मुख्यालयात दररोज ३०० ते ४०० तक्रारी प्राप्त होतात. यात पोलीस व नागरिकांचा दोघांचाही समावेश असतो. प्रत्येक महिन्याकाठी सुमारे ६ हजार अशा अर्जांचे पारदर्शकपणे निराकरण करण्यात येते. एकाच कार्यालयात होणाऱ्या तक्रारींच्या निराकरणाची संख्या ही राज्यात सर्वाधिक असावी.
- राजेंद्र सिंह, अप्पर पोलीस महासंचालक
(कायदा व सुव्यवस्था)