खड्ड्यांमुळे रस्ते जलमय
By Admin | Published: August 4, 2016 01:17 AM2016-08-04T01:17:35+5:302016-08-04T01:17:35+5:30
पावसामुळे रहाटणी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रहाटणी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रहाटणी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रस्त्यांवर खड्ड्यात पाणी साचल्याने अपघात होत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
रहाटणी चौकात बस थांबा आहे. या ठिकाणाहून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात जाण्यासाठी बस टर्मिनल आहे. मात्र इथेच पाणी साचत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जवळच पालिकेची प्राथमिक शाळा आहे. अनेक विद्यार्थी येथूनच बसने ये-जा करतात. मात्र रस्त्यावर पाणी आणि चिखल झाल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
रामनगर ते नखातेवस्ती चौकापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. गोडांबे कॉर्नर चौकात तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी जाण्याची कोणताही मार्ग नसल्याने, तसेच रहाटणी फाटा ते रहाटणी चौकापर्यंत रस्त्याला योग्य प्रकारे उतार न दिल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे. रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत.
याच ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला होता. तो पालिका प्रशासनाने बुजविला. मात्र त्याची योग्य प्रकारे दखल घेतली न गेल्याने याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडला आहे. यात एखादा मोठा अपघात होऊ शकतो. अशीच परिस्थिती नखाते चौक व लिंक रस्त्यावरील जय भवानी चौकाची आहे. या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले; मात्र योग्य प्रकारे सपाटीकरण करण्यात न आल्याने रस्त्याच्या मध्यभागी पाणी साचून राहत आहे.
पिंपळे सौदागरला भयावत परिस्थिती
पिंपळे सौदागर अगदी काही वर्षांच्या कालावधीत विकसित झाला असला, तरी पालिका प्रशासन विकासाच्या बाबतीत फोल ठरले आहे. या परिसरातील एकाही रस्त्याचे योग्य प्रकारे सपाटीकरण करण्यात आले नसल्याने भूमिगत स्टॉर्म वॉटर लाइन टाकल्या असल्या, तरी पाणी रस्त्यावरच थांबून राहत आहे. त्यामुळे रहाटणी-जगताप डेअरी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे. यातून पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा कामातील हलगर्जीपणा दिसून येत आहे. महानगरपालिका आयुक्त
दिनेश वाघमारे यांनी संबंधित
रस्त्यांची पाहणी करून अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
>निकृष्ट दर्जाची कामे
पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेकडून या भागात अनेक ठिकाणी रस्त्याच्या डागडुजीची कामे केली असल्याचा महापालिका प्रशासनाने दावा केला होता. मात्र, महिन्याभरातच या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महापालिकेने केलेल्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. त्यामुळे सदर कामाची पाहणी कोणत्या अधिकाऱ्याने केली आणि ठेकेदारांना बिले कोणी देऊ केली असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी होत आहे.
>खड्ड्यांमुळे अपघात
पिंपळे सौदागर भागात रस्त्यांचे सपाटीकरण योग्य प्रकारे केले नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचत आहे. यातून मार्ग काढत वाहनचालकांना जावे लागते. साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात. तसेच विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना या रस्त्यावरून पायी प्रवास करताना वाहनांमुळे उडणारे पाणी अंगावर झेलत जावे लागते. यामुळे अनेकवेळा वादावादीचे प्रसंगही घडले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा अशी मागणी होत आहे.