घाणेरड्या पद्धतीचे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 08:58 PM2022-05-17T20:58:21+5:302022-05-17T21:10:43+5:30
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शहरातील अजिंठा विश्रामगृहात सायंकाळी चार वाजता सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
जळगाव : राज्यात केतकी चितळे असो की नवनीत राणा यासह विविध विषयावरून सद्यस्थितीत ते राजकारण सुरू आहे. ते कुठेतरी थांबले पाहिजे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, असे सांगत हे सर्व थांबले पाहिजे, यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन व भाजपचे नेते, मनसेचे राज ठाकरे, असो की महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमध्ये मध्यस्थी करेन, मी सर्वांशी बोलायला तयार आहे, अशा शब्दांत राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शहरातील अजिंठा विश्रामगृहात सायंकाळी चार वाजता सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर ही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. असे बोलणे अत्यंत वाईटच असल्याने, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी निषेधाची भूमिका नोंदवली होती, याबद्दल मी त्यांचे आभारही मानले होते. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी मी स्वतः पुढाकार घ्यायला तयार आहे. तसेच प्रत्येक पक्षातील नेत्यांशी बोलायला तयार आहे. मात्र हे कुठेतरी थांबला पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
'मला खूप भीती वाटते'
मुंबई येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा बाबरी ढाचा पाडू असे वक्तव्य केले होते. यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी हसतच, अभिनय करत, 'मला खूप भीती वाटते', असं मिश्किल उत्तर दिलं. सुप्रिया सुळे यांच्या उत्तरावर यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.