अकार्यक्षम परिवहन व्यवस्थापक चले जाव

By Admin | Published: July 19, 2016 02:57 AM2016-07-19T02:57:20+5:302016-07-19T02:57:20+5:30

ठाणे परिवहन सेवेचा (टीएमटी) बट्याबोळ ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच, त्याचे पडसाद सोमवारच्या परिवहन समितीच्या बैठकीतही उमटले.

Disabled Transportation Manager | अकार्यक्षम परिवहन व्यवस्थापक चले जाव

अकार्यक्षम परिवहन व्यवस्थापक चले जाव

googlenewsNext


ठाणे : ठाणे परिवहन सेवेचा (टीएमटी) बट्याबोळ ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच, त्याचे पडसाद सोमवारच्या परिवहन समितीच्या बैठकीतही उमटले. परिवहनच्या इतिहासात प्रथमच टीएमटीविरोधात लक्षवेधी मांडली गेली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या, परिचालन आणि काटकसर करण्याऐवजी केवळ टीएमटीचा गाडा खोलात घालणाऱ्या परिवहन व्यवस्थापकांना शासनाकडे परत पाठवा, असा एकमुखी सूर या लक्षवेधीत उमटला. अखेर परिवहन सभापती दशरथ यादव यांनी सभापतींना शासनाकडे परत पाठविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले.
विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनीही परिवहन आणि व्यवस्थापकांविरोधात आक्रमक भूमिका घेत परिवहनचा कारभार सुधारला नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागले असा इशारा दिला. परिवहन प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवणारा वृत्तांत सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये रिपोर्टर आॅन दि स्पॉट या शीर्षकाखाली प्रसिध्द झाला. त्याची दखल परिवहन समितीच्या सदस्यांनी घेतली. प्रसिध्द झालेल्या प्रत्येक मुद्द्याला धरुन सत्ताधारी सदस्यांसह विरोधकांनीही परिवहन प्रशासनाची चिरफाड केली.
>टायर खरेदीत गैरव्यवहार
भांडार विभागावर तर त्यांनी जाहीर आक्षेप नोंदवितांना येथे गैरव्यवहार होत असल्याचे पुरावेच सभागृहासमोर सादर केले. टायर खरेदी करतांना त्याच्या बंद लिफाफ्याद्वारे निविदा काढल्या जातात. परंतु त्या अंतिम होतांना प्रत्येक निविदाकाराकडून आधीच दर मागिवले जातात आणि आपल्या पसंतीच्या ठेकेदारालाच भांडारपाल आणि व्यवस्थापकांच्या संगनमताने ठेका दिला जातो, असा जाहीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली. त्यावर लेखा आणि वित्त विभागामार्फत चौकशीचे आदेशही सभापतींनी दिले.
वाहकाला दोन
तास ठेवले डांबून
काही दिवसांपूर्वी सॅटीसवरील वाहकाला लघुशंकेसाठी रेल्वे हद्दीतील शौचालयात जावे लागले होते. परंतु त्याने सर्व पुरावे सादर करुन देखील त्याला २६१ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि त्याला चक्क दोन तास डांबून ठेवत त्याचा मोबाईलही काढून घेण्यात आल्याचा मुद्दा भोर यांनी उघड केला. त्यामुळे वाहक आणि चालकांसाठी सॅटीसवरच शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याच मागणी त्यांनी केली.

Web Title: Disabled Transportation Manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.