विशेष सवलतीपासून शेतकरी वंचित
By admin | Published: September 9, 2015 03:27 AM2015-09-09T03:27:43+5:302015-09-09T03:27:43+5:30
शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी दिले जाते; मात्र या योजनेचा फायदा राष्ट्रीयीकृती बँकेकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे.
अकोला : शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी दिले जाते; मात्र या योजनेचा फायदा राष्ट्रीयीकृती बँकेकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत असतानाच राज्य व केंद्राच्या हिश्शातील ४ टक्के व्याजाची परतफेड होत नसल्याने बिनव्याजी कर्जावरही शेतकऱ्यांच्या खिशातून ४ टक्के व्याजाची आकारणी होत
आहे.
राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सलवत योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत एक लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याज सलवत दिली जाते. त्याची परतफेड राष्ट्रीयीकृत बँकांसोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातूनही होते.
जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून पीक कर्जावर ६ टक्के व्याज आकारणी होते. त्यापैकी ३ टक्के व्याज परतावा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून मिळतो, तसेच उर्वरित ३ टक्के व्याज परतावा नाबार्डच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज
घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी मिळते.
त्याचवेळी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र त्याच पीक कर्जासाठी ७ टक्के व्याज आकारणी केली जाते. त्यातील ३ टक्के व्याजाचा परतावा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत केला जातो.
उर्वरित ४ टक्के व्याजाचा परतावा करण्यासाठी राज्य शासनाने १ टक्का व केंद्र सरकारने ३ टक्के हिस्सा उचलावा, असा नियम आहे; मात्र या नियमाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेकडून १ लाखापर्यंतचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ४ टक्के व्याज दर भरावा लागत असून, त्यांना बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभच मिळत नसल्याचे वास्तव आहे.