सुकाणू समितीतील मतभेद उघड!
By admin | Published: June 11, 2017 04:53 AM2017-06-11T04:53:21+5:302017-06-11T04:53:21+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेतच समितीच्या नेत्यांमधील मतभेद जाहीर झाले. रविवारच्या बैठकीला
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेतच समितीच्या नेत्यांमधील मतभेद जाहीर झाले. रविवारच्या बैठकीला कोण जाणार, याची निवड करण्याचे अधिकार खासदार राजू शेट्टी यांना देण्यात आल्याचे शेकापचे जयंत पाटील यांनी जाहीर करताच, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी असे काही होणार नाही,
सर्व ३५ संघटनांचे सदस्य बैठकीला जातील,
असे माइक स्वत:कडे ओढून घेत जाहीर करून टाकले.
सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय मंत्रीगट परिषदेने सुकाणू समितीच्या सदस्यांना रविवारी चर्चा करण्यासाठी येण्याचे रितसर निमंत्रण दिले असून, ही चर्चा दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होईल, अशी माहिती मंत्रीगट परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मुंबईत शेकापच्या कार्यालयात राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या ३५ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यास खा. राजू शेट्टी, जयंत पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, डॉ. अजित नवले, नामदेव गावडे, गणेश कदम, प्रतिभा शिंदेंनी सुरुवातीपासून हजर होते. मात्र, डॉ. गिरधर पाटील, अनिल घनवट, रामचंद्रबापू पाटील आणि डॉ. बुधाजीराव मुळीक हे बैठकीला आले नाहीत. तर रघुनाथ पाटील उशिरा आले.
डॉ. गिरधर पाटील यांनी या बैठकीवर टीकेची झोड उठवली. बैठकीचे निमंत्रण सर्वांना देण्यात आले. पण आपल्याला याची माहितीही दिली गेली नाही, असे डॉ. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. समितीतले काही विशिष्ट लोक परस्पर निर्णय घेतात, असे सांगून डॉ. पाटील म्हणाले, सरकारशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. शेतकरी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, मगच चर्चा करा असा पहिला ठराव होता. पण त्यावर चर्चा करण्याची इच्छा नसल्याचे सांगत समितीतल्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.
सरकार ३१ आॅक्टोबर कर्जमाफी करू, असे सांगत असले तरी, तोपर्यंत थांबण्यास आम्हाला वेळ नाही, असे रघुनाथ पाटील म्हणाले. तर त्यांच्याच शेजारी बसलेल्या खा. राजू शेट्टी यांनी मात्र रविवारच्या बैठकीत काही निर्णय होणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण सरकारची म्हणणे काय आहे ते कळेल, असे सांगितले.
तर जयंत पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत, सरकारचे म्हणणे समजून घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे सांगत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
सरकारसमवेत रविवारी चर्चा होणार असली तरी सोमवारचे धरणे आंदोलन आणि मंगळवारचे रेल रोको आंदोलन ठरल्याप्रमाणे होईलच, असेही खा. शेट्टी व जयंत पाटील यांनी जाहीर केले.
सुकाणू समितीतील मतभेद टाळण्यासाठी समितीची विभागणी करुन एक कोअर कमिटी आणि एक व्यापक समिती असेल. समन्वयासाठी कोअर कमिटी आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व्यापक समिती काम करेल अशी चर्चा शनिवारी झाली पण बैठकीस उशिरा आलेल्या रघुनाथ पाटील यांनी सगळे सदस्य बैठकीला जातील, असे सांगत या मुद्यालाही खोडा घातला.
रविवारच्या बैठकीत लगेच काही ठरणार नाही. काही निवडक मंडळी सह्याद्रीवर जातील. ३० ते ४० जण जाऊन काय चर्चा होणार?
- खा. राजू शेट्टी
सुकाणू समितीचे निवडक सदस्य रविवारच्या बैठकीत जातील. त्यांची नावे निवडण्याचे अधिकार आज झालेल्या बैठकीत आम्ही राजू शेट्टी यांना दिले आहेत. रघुनाथ पाटील उशिरा आल्याने त्यांना हा निर्णय माहिती नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
- आ. जयंत पाटील
तसे काहीही होणार नाही... उशिरा आलो म्हणून काय झाले ? सगळेच्या सगळे ३५ सदस्य बैठकीला जातील. हे मी तुम्हाला आश्वासन देतो.
- रघुनाथ पाटील
सुकाणू समितीच्या बैठकीला
उपस्थित न राहण्याचा मी निर्णय घेतला. बैठकीचं निमंत्रणही मला दिले नव्हते. ही समिती नेमल्याचीही माहिती नव्हती. या समितीत राजकीय थिल्लरपणा सुरू आहे.
- डॉ. गिरधर पाटील
डॉ. गिरधर पाटील खोट बोलत आहेत. आजच्या बैठकीसाठी आम्ही सगळ्यांना फोन करून निमंत्रण दिले आहे. ते असे का म्हणत आहेत, हे माहीत नाही.
- राजू देसले, निमंत्रक, सुकाणू समिती