मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आंदोलकांमध्ये मतभेद; भर पावसात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 03:11 PM2023-09-08T15:11:37+5:302023-09-08T15:12:20+5:30
गेल्या ४० वर्षात तुम्ही मराठा समाजाची व्यथा ऐकली नाही त्यामुळे आज आमच्यावर ही परिस्थिती आली आहे असा आरोप त्यांनी केला.
मुंबई – जालना येथील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १० दिवसांहून अधिक काळ उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांनी मागणी आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून मराठा समाजात दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील काही जणांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून भरपावसात आंदोलन केले आहे.
मराठा ठोक मोर्चाचे प्रमुख आबा पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत राज्यभरात काही राजकीय लोकं मराठा कुणबी, ओबीसी-कुणबी मराठा हा वाद विवाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे तो थांबला पाहिजे. माझी राजकीय नेत्यांना विनंती आहे तुम्ही मराठा समाजाला सहानुभूती दाखवण्यापेक्षा, ओबीसी-कुणबी वाद लावण्यापेक्षा थेट मुख्यमंत्र्यांना भेटावे, मराठा समाजाच्या व्यथा मांडाव्यात. गेल्या ४० वर्षात तुम्ही मराठा समाजाची व्यथा ऐकली नाही त्यामुळे आज आमच्यावर ही परिस्थिती आली आहे असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत आमच्या समाजाला वेगवेगळ्या विभागात विभागण्याचे काम कुणी करू नये. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र आधीच मिळत आहे. परंतु आता नवीन आदेश काढणार असाल तर तो कसा आहे तो समाजाला पटवून द्यावा. जात पडताळणी होणार आहे का? वेगवेगळी मागणी येतेय त्याचा समाजाला फायदा होणार आहे का? याचेही स्पष्टीकरण द्यावे अन्यथा जी मराठा समाजाची मागणी आहे. त्या मागणीवर सरकारने निर्णय घ्यावा, राज्यातील प्रमुख संघटना, नेते यांची सामुहिक बैठक लावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, मराठा समाजाची वाताहात होऊ देऊ नका ही आमची मागणी असल्याचे मराठा ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक मागासलेले पण असलेल्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे. राज्य मागासवर्गीय आयोगातील त्रुटी दूर करून शिफारशी लागू कराव्यात ही सकल मराठा समाजाची मागणी आहे. मराठा समाजाने सरकारकडे अनेक दिवसांपासून ही मागणी केली आहे. त्याचसोबत मराठा तरुणांचे प्रश्न आहे. एमपीएससीचे प्रश्न आहेत. मराठा शेतकरी बांधवांचे प्रश्न या सर्वांवर सरकारने निर्णय घ्यायला हवा अशी आमची मागणी आहे असंही त्यांनी सांगितले.