इंग्रजी शिक्षणामुळे मराठीचा लोप
By admin | Published: January 18, 2016 12:50 AM2016-01-18T00:50:57+5:302016-01-18T00:50:57+5:30
मुलांचे शिक्षण मराठीत असावे की नाही, मराठी हा विषय शालेय शिक्षणात असावा का, हे चर्चेचे विषय मागे पडू लागले आहेत. पालक नेहमी मुलांच्या दृष्टीने विचार करतात
नीलेश जंगम , ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
मुलांचे शिक्षण मराठीत असावे की नाही, मराठी हा विषय शालेय शिक्षणात असावा का, हे चर्चेचे विषय मागे पडू लागले आहेत. पालक नेहमी मुलांच्या दृष्टीने विचार करतात व त्यांना इंग्रजीतून शिक्षण देतात. या मूळ कारणामुळे मराठी भाषा व्यवहारातून लोप पावत आहे, असा ओहापोह ‘मराठी भाषेत व्यवहार आणि व्यवहारात मराठी भाषा’ या परिसंवादातून करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात (उपमंडपात) या परिसंवादाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी बाळकृष्ण कवठेकर होते. शैलेश पांडे, डॉ, जयद्रथ जाधव, अनुराधा ठाकूर, वैशाली पत्की, डॉ. शैलजा जोशी, आनंद पाटील या वक्त्यांनी परिसंवादात विचार मांडले. उपस्थितांचा स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी या विषयी शासनाचे धोरण काय आहे, हे सांगितले. संपूर्ण व्यवहार मराठीतून होण्यासाठी भाषा संचालनालयाची गरज आहे. याबाबत विविध कोष, शब्दावल्या त्यांनी सांगितल्या. भाषेचे धोरण राबविणारी एक मराठी समिती आहे. ज्ञानव्यवहारात कोष तयार केला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाने मराठीची कास सोडता कामा नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठीएवढा उत्सव कोणत्याही भाषेत होत नाही. तरीही आपल्याला संवाद साधावा लागतो, असा निराशेचा सूर लावण्यापेक्षा काळजी व चिंता केली पाहिजे. मराठी भाषेत व्यवहार होत राहिला, तरच व्यवहारात मराठी भाषा राहील. माध्यमांच्या स्थानात मराठीचे स्थान दुय्यम आहे.
मराठीची जपणूक करणे, तिचा सन्मान करणे, तिची व्यवहारात प्रतिष्ठापना करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दुजाभाव हा मराठीसाठी अडथळा ठरत आहे. व्यवहारात तिला लोकांनी पहिले स्थान दिले पाहिजे, असे शैलेंद्र पांडे यांनी सांगितले.
आनंद पाटील म्हणाले, ‘‘मराठी भाषेविषयी सर्व जण चिंता करीत आहेत, ही परिस्थिती शोभणीय आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. याचा विचार करू, तेव्हा मराठी भाषेचा विकास होईल. व्यवहारातही मराठी भाषेचा वापर केल्यास काळजी करण्याची गरजच नाही. मराठी ही मातृभाषा आहे, अस्मिता आहे, याचा अभिमान आहे. राज्यभाषा आहे, मग व्यवहाराची भाषा का असू नये? यासाठी मराठी माणूसच कमी पडत आहे.’’
हिंदी राज्यभाषा, इंग्रजी सहायक, तर मराठी ही क्षेत्रीय भाषा समजली जाते. बँकेकडून व्यवहार मराठीतून करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संकेत, फलक, सूचना, सेवा, उत्पादन, शिक्के मराठीत आहेत. एटीएम यंत्रामध्येही मराठी भाषा आहे. मोबाइल बँकिंगमध्येही मराठीतून सूचना आहेत. भाषा हे उद्दिष्ट नाही. भाषा हे माध्यम आहे. संवाद साधण्यासाठी भाषेची निर्मिती झाली आहे. मराठी भाषा उत्तमपणे व्यवहारात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे अनुराधा ठाकूर यांनी सांगितले.
मराठीचे प्रेम व कळक ळ प्रत्येकाच्या मनात असली, तरच मराठी भाषेचा विस्तार होईल, असे मत वैशाली पत्की यांनी व्यक्त केले.
डॉ. शैलजा जोशी म्हणाल्या, ‘‘मानवी जीवनात भाषेचे महत्त्व आहे. भाषा ही मुखावाटे व्यक्त होणारी मौखिक क्रिया आहे. व्यवहाराची भाषा बदलली की, वास्तव बदलते.’’