दिवाळीच्या सुट्टीतही कामाला लावल्याने शिक्षकांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 06:27 AM2019-10-17T06:27:33+5:302019-10-17T06:27:45+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरावे लागणार
मुंबई : आधीच शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्टीवरून संभ्रम असताना, आता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिवाळीच्याच सुट्टीत भरून द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांनी आॅनलाइन भरलेली आवेदनपत्रे शिक्षकांना ६ ते १५ नोव्हेंबरदरम्यान भरायची असून, मंडळाकडे सादर करायची आहेत. त्यामुळे आधी निवडणुकीमुळे आणि आता आवेदनपत्र भरण्याच्या कामामुळे दिवाळीच्या सुट्टीवर गदा आल्याची नाराजी शिक्षकांमध्ये आहे.
निवडणूक कामांमुळे आधीच शिक्षकांच्या सुट्ट्या आणि शाळांचे नियोजन यात संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे शालेय शिक्षण विभागाने त्वरित निर्णय घेऊन या संदर्भात उपसंचालक कार्यालयाने सूचना जाहीर कराव्यात आणि यात सुसूत्रता आणावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. अशातच राज्य मंडळातर्फे परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक शाळांना त्याबाबतच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. शाळांनी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत मोजके विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ६ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत भरायचे आहेत.
काही शाळांना दिवाळीची सुट्टी १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे शिक्षकांना १५ नोव्हेंबर आधीच म्हणजे दिवाळीची सुट्टी संपण्यापूर्वीच शाळांमध्ये अर्ज भरण्याच्या कामासाठी हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.