सहा अभियंत्यांचे निलंबन मागे घेण्याची नामुष्की
By admin | Published: October 21, 2015 02:55 AM2015-10-21T02:55:07+5:302015-10-21T02:55:07+5:30
मुंबईच्या बांधकाम विभागात घोटाळा झाल्याचे सांगून, घाईघाईने २२ अभियंत्यांना निलंबित करणाऱ्या युती सरकारवर यातील सहा जणांचे निलंबन मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे.
यवतमाळ : मुंबईच्या बांधकाम विभागात घोटाळा झाल्याचे सांगून, घाईघाईने २२ अभियंत्यांना निलंबित करणाऱ्या युती सरकारवर यातील सहा जणांचे निलंबन मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. संबंध नसताना या सहा अभियंत्यांना यात गोवले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने या अभियंत्यांना पुन्हा सेवेत घेताना ही चूक कबूलही केली आहे.
आर.बी. मेळेकर, एस.जी. पवार, के.पी. पाटील, व्ही.पी. जोशी, ए. के. पोळ, एस.एम. शेट्ये अशी या अभियंत्यांची नावे आहेत. त्यांना १ सप्टेंबर २०१५ रोजी अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुळकर्णी यांच्या निर्देशावरून निलंबित करण्यात आले होते. वास्तविक, त्यांचा या घोटाळ्याशी संबंध नसल्याची बाब दुसऱ्याच दिवशी स्पष्ट झाली. मात्र, लगेच आॅर्डर फिरविल्यास प्रकरण अंगलट येईल, याची जाणीव झाल्याने ४५ दिवसांनंतर निलंबन रद्द करण्यात आले. १५ आॅक्टोबर रोजी या संबंधीचे आदेश जारी केले गेले. त्यांना पूर्वपदावर व पूर्वीच्याच ठिकाणी कायम ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)