सयामी जुळ्यांना मिळणार डिस्चार्ज
By admin | Published: August 16, 2016 01:51 AM2016-08-16T01:51:27+5:302016-08-16T01:51:27+5:30
सायन रुग्णालयात जुलै महिन्यात जन्माला आलेल्या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी रुग्णालयाने केली होती. पण, सयामी जुळ्यांच्या आईने शस्त्रक्रिया करू नका, असे रुग्णालयाला
मुंबई : सायन रुग्णालयात जुलै महिन्यात जन्माला आलेल्या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी रुग्णालयाने केली होती. पण, सयामी जुळ्यांच्या आईने शस्त्रक्रिया करू नका, असे रुग्णालयाला सांगितल्याने शस्त्रक्रिया लांबणीवर गेली आहे. आई आणि बाळांची प्रकृती स्थिर असल्यामुळे आईने डिस्चार्ज मागितला आहे. पुढच्या काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिली.
हृदय एकच असणाऱ्या सयामी जुळ्यांचा जन्म २७ जुलै रोजी सायन रुग्णालयात झाला. या सयामी जुळ्यांमधील एका बाळाच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली आहे. तर, दुसऱ्या बाळाच्या शरीराचा खांद्यावरच्या भागाची वाढ पूर्ण झाली आहे. त्यामुळे या सयामी जुळ्यांना विलग करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्या वेळी कुटुंबीयांनी शस्त्रक्रिया करण्याची तयारी दाखविली होती. त्यानुसार, बाळांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यांना वेगळे करणे ही अत्यंत गुंतागुंतीची आणि जिकिरीची शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण किती याची ग्वाही देता येणार नाही, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पण, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्यास शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय बाळाच्या आईने घेतला आहे.
सयामी जुळ्यांची वाढ पूर्ण झाली नसल्यामुळे एकाला श्वसनास त्रास होत आहे. त्यामुळे या मुलांना आॅक्सिजन दिला जातो. घरी गेल्यावरही बाळांना हा त्रास जाणवू लागल्यास त्यांना आॅक्सिजन कसा द्यावा हे पालकांना समजावून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
- या बाळांच्या हृदयात काहीतरी गुंतागुंत असल्याचे वाटत आहे. पण, सध्या बाळांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना कोणताही त्रास नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. मर्चंट यांनी सांगितले.