अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 01:04 PM2022-07-14T13:04:06+5:302022-07-14T13:05:21+5:30

कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेऊन महाराष्ट्र जलसंपदा विभागाने कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.

Discharge of one lakh 25 thousand cusecs of water from Almatti Dam started | अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय

अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय

googlenewsNext

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील महापुराचे संकट टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१३ मीटरपेक्षा जास्त ठेवू नये, अशी विनंती महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने कर्नाटकला केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पाचनंतर अलमट्टीतून एक लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.

कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेऊन महाराष्ट्र जलसंपदा विभागाने कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, बदलत्या पर्जन्यमानाचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून आणि आंतरराज्यीय समन्वय बैठकीत चर्चा केल्यानुसार, पुरेशी पातळी राखावी आणि नियमन करावे. उप-खोऱ्यातील सुरळीत निरीक्षणासाठी धरणातून विसर्ग वाढवावा. अलमट्टी धरणात दि. १५ ऑगस्टपर्यंत ५१३ मीटरपेक्षा जास्त पाणीपातळी ठेवू नये.

त्यानुसार अलमट्टी जलाशयाच्या अधीक्षक अभियंत्यांनी बुधवारी सायंकाळी पाचनंतर पाण्याचा विसर्ग एक लाख २५ हजार क्युसेकपर्यंत वाढविला आहे. सध्या अलमट्टी धरणात ८८.५०३ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणीपातळी ५१७.३२ मीटर आहे. कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे अलमट्टी धरणात एक लाख चार हजार ३०५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर धरणातून एक लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.

अलमट्टीतील अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय : मिलिंद नाईक

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका पोहोचू नये, यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. अलमट्टीतील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी रोज संपर्क आहे. जल आयोगाच्या नियमानुसार ५१३ मीटर पाणीपातळी ठेवण्यासाठीही विनंती केली आहे. अलमट्टी धरणात एक लाख चार हजार ३०५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून एक लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे, अशी माहिती जलसंपदाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी दिली.

चार दिवस पावसाचे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात दि. १७ जुलैपर्यंत संततधार पाऊस सुरूच राहील, असा अंदाज आहे. कोयना, वारणेसह राधानगरी, धोम, कण्हेर या पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. यामुळे कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांचा महापूर टाळण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग दोन लाख क्युसेक करण्याची गरज आहे, असे मत सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले.

Web Title: Discharge of one lakh 25 thousand cusecs of water from Almatti Dam started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.