विधानसभेची शिस्त बिघडली; सत्ताधारी, विरोधक नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:42 IST2025-03-22T11:27:17+5:302025-03-22T11:42:01+5:30
एका दिवसात तीनच लक्षवेधी मांडण्याचा नियम, प्रत्यक्षात ३५ लक्षवेधी; भाजपचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले....विधानभवनचे झाले लक्षवेधी भवन

विधानसभेची शिस्त बिघडली; सत्ताधारी, विरोधक नाराज
मुंबई : एका दिवशी तीन लक्षवेधी मांडून त्यावर प्रत्येकी दहा-दहा मिनिटे चर्चा व्हावी, असा नियम असताना ३५-३५ लक्षवेधी मांडल्या जात आहेत. सभागृहाची शिस्त बिघडली आहे, या शब्दात विरोधी पक्ष आणि सत्तारुढ सदस्यांनीही विधानसभेत शुक्रवारी नाराजी बोलून दाखवली. गणपूर्तीअभावी दहा मिनिटे कामकाज थांबवण्याची नामुष्कीही ओढावली.
विधानसभेत शुक्रवारी लावण्यात आलेल्या ३५ लक्षवेधीवरून भाजपचे सुधीर मुनगुंटीवार पुन्हा एकदा संतापले.
माथाडी कामगार विधेयकावर बोलताना मुनगुंटीवार म्हणाले, कामगार कायद्यात बदल करत असताना आपण कामगारांना संरक्षण देता, तसे आमदारांनादेखील संरक्षण देणे आवश्यक आहे. कारण विधिमंडळ अधिवेशनात विधेयकावर कामकाज करायचेच नाही, असे ठरलेले दिसते. सध्याचे विधानसभेचे कामकाज नियमाप्रमाणे एका टक्काही चालत नाही. त्यामुळे आपल्या नावात जरी विधानभवन असले, तरी ते आता ‘लक्षवेधी’ भवन झाले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यांच्या मुद्द्यांना सत्ताधारी आणि विरोधकांनी टाळ्या वाजवत समर्थन दिले.
विधानभवनातही ‘लक्षवेधी‘चीच चर्चा
अधिवेशनात लक्षवेधींची संख्या खूप असते. विधानभवनाच्या आवारातही पत्रकार आणि ज्येष्ठ आमदारांमध्ये एवढ्या लक्षवेधी घेण्यामागचे गुपित काय अशी चर्चा होती.
आम्ही विरोधकांना मोठी पदे देतो
विधानसभेत माथाडी कामगार विधेयक मंजूर करताना गणपूर्ती कोरमसाठी अध्यक्षांनी दहा मिनिटे बेल वाजवली. मात्र, शुक्रवार असल्याने आमदार मतदारसंघात निघून गेल्याने कोरम पूर्ण झाला नाही. शेवटी विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन करावे, अशी सूचना मुनगंटीवार यांनी मंत्री विखे पाटील यांना केली. विखे-पाटील यांनी विनंती केल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा छळ केला, आता मदत कशी लागते?
आमचे हृदय एवढे मोठे आहे की विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतो आणि त्यांना मोठमोठी पदे देतो. एवढ्या मोठ्या मनाचा पक्ष स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा लाभला आहे, असा मिश्किल टोला मुनगंटीवार यांनी लगावला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
भास्कर जाधव अन् नीलेश राणे यांच्यात वाक् युद्ध
उद्धवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव हे सभागृहातील कामकाजाविषयी बोलत असताना शिंदेसेनेचे नीलेश राणे यांनी त्यांचा उल्लेख एकेरीत केल्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. त्यावर सभागृहाचा सन्मान कसा राखावा, हे नवीन सदस्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रतोदांकडून समजून घ्यावे, या शब्दांत तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कान टोचले.
सभागृहामध्ये एका दिवसात तीनच लक्षवेधी सूचना मांडल्या जाव्यात, असा नियम आहे. पण, आज ३५ लक्षवेधी कामकाजात आहेत. सदस्यांना खुश करण्यासाठी आपण सभागृहाची ऐशीतैशी करत आहात का? असा प्रश्न शरद पवार गटाचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी केला. आमदारांना खुश करण्यासाठी सभागृहाची परंपरा पायदळी तुडवू नका, असेही पाटील म्हणाले. आपल्या भावना मी अध्यक्षांकडे पोहोचवेन, असे तालिका अध्यक्ष योगेश सागर म्हणाले.
त्यानंतर उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी चार-चार तास लक्षवेधींसाठी दिला जातो, पण अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागणीवर चर्चेसाठी किती वेळ देणार आहात, या मागण्यांचा विषय हा राज्याच्या हिताचा असतो याकडे लक्ष वेधले. त्याचवेळी नीलेश राणे यांनी उभे राहून भास्कर जाधव यांच्याबाबत शेरेबाजी सुरू केली. त्यावरून उद्धवसेनेचे आमदार आणि नीलेश राणे यांच्यात खडाजंगी झाली.