वाशिम बाजार समिती बरखास्त
By Admin | Published: January 16, 2017 08:39 PM2017-01-16T20:39:25+5:302017-01-16T20:39:25+5:30
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एकूण १७ निर्वाचित संचालकांनी कलम ४५ ची अपात्रता धारण केल्याने १७ संचालकांना पदावरुन कमी करण्यात येवून वाशिम बाजार समिती बरखास्त करण्यात येत असल्याचा आदेश
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 16 - वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एकूण १७ निर्वाचित संचालकांनी कलम ४५ ची अपात्रता धारण केल्याने १७ संचालकांना पदावरुन कमी करण्यात येवून वाशिम बाजार समिती बरखास्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक डी.आर. खाडे यांनी १६ जानेवारी रोजी दिला. कोरमअभावी समिती वैधानिकदृष्टया गठीत होत नसल्याने कृषि उत्पन्न बाजार समितीचे नियमित कामकाज करण्याकरिता कार्यालय अधिक्षक जी.बी.राठोड यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे खाडे यांनी आपल्या आदेशात नमूद केले.
बाजार समितीचे आडते गिरधर रामेश्वर सारडा यांनी ५२ आडते व खरेदीदार यांच्यासह गोडावूनची मागणी करुनही बाजार समितीने गोडावून न दिल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकाकडे केली होती. तसेच तज्ज्ञ संचालक बंडू विठ्ठल महाले व आनंद तुळशिराम मालपाणी यांनी विविध कामांची चौकशी करण्याबाबत उपनिबंधकांना तक्रार दिली होती. याशिवाय संचालक कृषि पणन मंडळ पुणे या कार्यालयाने वाशिम बाजार समिती विरोधात योग्य ती चौकशी करून कारवाईच्या सूचना उपनिबंधकांना दिल्या होत्या. या सर्व बाजूंचा विचार व युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी, महाराष्ट्र शासनाच्या ५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनीमय) अधिनियम १९६३ चे कलम ४५ (१) नुसार कृषि उत्पन्न बाजार समितीतील निर्वाचित १७ संचालकांना अपात्र ठरविण्याचा आदेश १६ जानेवारी रोजी दिला.
सदरहू आदेशात खाडे यांनी वाशिम कृषि उत्पन्न बाजार समिती विरोधातील तक्रारी पाहता संचालक मंडळास वारंवार सुचना देवूनही संबंधित तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यास संचालक मंडळ सक्षम नाही तसेच १० डिसेंबर २०१५ च्या संचालक मंडळाच्या बैठकीतील विषय क्रमांक ४(अ) व ठराव ४(अ) नुसार शोभा दामोदर काळे वगळून एकूण १७ निर्वाचित संचालकांनी ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या असून बाजार समिती संचालक मंडळाने कलम १२ (१) चे उल्लंघन केले तसेच बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याची खात्री झाल्यामुळे, सदर १७ निर्वाचित संचालक अपात्र ठरवित असल्याचे आदेशात म्हटले.
बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयामुळे जिल्हयातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.